युगंधर शिवाजी सावंत yugandhar shivaji savant


#युगंधर
स अधिक हित म्हणजे साहित्य. वाचकाचं कणभर तरी हित साधतं ते साहित्य..! शिवाजीराव सावंत यांनी मृत्युंजय (कर्ण), छावा(छत्रपती शंभूराजे) तदनंतर #युगंधर योगयोगेश्वर श्रीकृष्णाच्या चरित्रग्रंथावर त्यांनी ही कादंबरी सिद्ध केली. तब्बल इंग्रजीतील ३३ आणि मराठीतील ८२ संदर्भ ग्रंथांच्या अभ्यासातून. या कादंबरीत श्रीकृष्णाच्या प्रेमयोगावर आधारित बरसच भाष्य आहे.
युगंधर या कादंबरीत बोलणाऱ्या व्यक्तिरेखा सात आहेत. सात भागत ही कादंबरी विभागली आहे. त्यात अनुक्रमे स्वतः श्रीकृष्ण, कृष्णपत्नी रुक्मिणी, कृष्ण सारथी दारूक, पांडवपत्नी द्रौपदी, धनुर्धर अर्जुन, यादव सेनापती सात्यकी आणि कृष्ण परमसखा चुलतबंधु उद्धव असे भाग आहेत.
महाभारत भारतवर्षात जुन्यात जुना उपलब्ध ऐतिहासिक दस्तऐवज आहे. महाभारत ही भाकडकथा नाही. आणि गीता ही महाभारताच्या कथासागरातील अशी मौल्यवान घागर आहे जीच्यातील थेंबाथेंबात मानवी जीवनाचा सागर शब्दशः घुसळून काढण्याचं सामर्थ्य आहे. त्या महाभारताचा कणा, नायक श्रीकृष्ण आहे.
युगंधर कादंबरीची सुरवात देखील मृत्युंजय प्रमाणे, मलाही आज बोललंच पाहिजे !! या वाक्यातून होते. फरक एवढाच की तिथे प्रवाहातील अडथळे दूर करण्यासाठी झगडणाऱ्या संभ्रमित कर्णाला बोलायचं असतं, तर इथे जिथं तिथं म्हणून जीवन तटलेलं, तुंबलेलं असेल ते जीवन प्रवाही करणाऱ्या जलपुरुष नित्यप्रवाही योग योगेश्वर, युगंधर श्रीकृष्णाला..!!
पण नेमक्या कोणत्या नात्यानं बोलावं असा त्याला प्रश्न पडतो. बालवयातच नाना नावांच्या, नानाविध रुपांच्या असुरांना, राक्षसांना, लीलया वधनारा "लिलापुरुष" म्हणून ? अक्षम्य वाटावी अशी स्नानमग्न गोपींची वस्त्रं चोरणारा "नटखट चोरटा" म्हणून ? प्रथम गोपांचा नि पुढं यादवांचा प्रमुख झालेला "योद्धा" म्हणून ? राजा नव्हे...!, ज्याच्या पित्याच्या घरी दह्या, दुधाचे डेरेच डेरे असताना त्याची चोरी करणारा "खट्याळ चोरटा" म्हणून ? अवतार या गोंडस उपाधीची झुल पांघराणार " किमयागार" म्हणून ? द्रौपदीला नेमक्या क्षणी लज्जारक्षणासाठी वस्त्रं पुरवणारा किमयागार म्हणून ? महाकाव्य महाभारताचा एकमेव कणा म्हणून ? अठरा अक्षौहिनी बलदंड योद्धयांच्या रोमहर्षण, प्राणांतक, अनावश्यक समरखेळ मांडणारा लहरी खेळगडी म्हणून ? जरासंधाचे आक्रमण मथुरेतून वळवण्यासाठी युद्ध रणांगण सोडून गेलेला "रणछोडदास" म्हणून ? की त्यांचा एकमेव नायक म्हणून ?
भगवान विष्णूचा अंश म्हणून मान्य करणारे आपण, तो तुमच्या आमच्या प्रत्येकात अंशरूपाने नांदतो आहे, हे मात्र आकलून घ्यायची आपली तयारी नसते. आपल्यापासून दूर असलेल्या देव्हाऱ्यातील "वासुदेव" न मानता तुमच्या मनाच्या देव्हाऱ्यातील "अच्युतच" तुमच्याशी बोलतोय म्हणून कादंबरीची सुरवात होते.
प्रथम विशेष उल्लेख करावा वाटतो तो राधेचा...
प्रथम गोकुळ, गोकुळ म्हंटल की गवळणी सोबत, कृष्णाची सखी राधा ही आलीच. कारण जनमानसात ती पक्की रुजलेली व्यक्तिरेखा आहे. राधा या शब्दाचा अर्थ आहे, मोक्षासाठी तळमळणारा जीव. शिवाजी सावंत यांनी राधेला "प्रातिनिधिक गोपस्त्री" म्हणून या कादंबरीत स्थान दिलं आहे. गोकुळाच्या प्रत्येक गोपीत त्यांना मोक्षासाठी अपार तळमळणारे जीव दिसत होते. त्यांनी गोकुळातील गोप "रायाण" याची पत्नी म्हणून राधेला स्थान दिलं आहे. श्रीकृष्णाच्या जीवनातील वासनारहित, भावभरीत, अतुल प्रेमयोगाची मधुरा भक्तीची, प्रिय सखी, पहिली स्त्रिगुरु राधा.
#राधा या जनमानसात पक्क्या रुजलेल्या व्यक्तिरेखेला भागवत, महाभारत, हरिवंशपुरान किव्हा ब्रह्मवैवर्तासारख्या श्रीकृष्णाशी निगडित अधिकृत संदर्भ ग्रंथापैकी एकताही निसटताही संदर्भ नाही. तिचं नावसुद्धा एखाद्या उपस्थितांच्या दीर्घ यादीत नाही ! ती श्रीकृष्णचरित्राचा चिकटली ती पंधराव्या शतकात "गीत गोविंद" या शृंगाररसाला वाहून घेतलेल्या जयदेव कवीच्या अत्यंत जनप्रिय झालेल्या रसाळ खंडकाव्यातून. त्या गीत गोविंदाचा आधार घेऊन त्यानंतर अनेक शतकं राधेलाही प्रतिभावंत कवींनी नाना अविष्कारांत काव्यातून मनसोक्त मढवून श्रीकृष्णासह सादर केलं, आणि असमर्थनिय धुमाकूळ घातला.
#श्रीकृष्ण
या कादंबरीतील सर्वच प्रसंग शिवाजी सावंत यांनी आपल्या लेखणीतून अगदी उभे केलेत. गोकुळ, वृंदावनातील सारे प्रसंग किती सुंदर पद्धतीने मांडलेत..!! कृष्णा कपटी कंस मामाचा वध करून कृष्णगीतेतील कंसपर्व संपवतो. कंस वधाचे पर्व तेवढे लवकर आपोटले आहे. तदनंतर गोकुळात कृष्ण म्हणून वाढलेल्या वसुदेव पुत्राला मथुरेचे राजपुरोहित गर्गमुनी वेदापासून उपनिषदांपर्यंत प्रणवसदृश एकाक्षरी, उपसर्गी, सर्वश्रेष्ठ मानलेली "श्री" ही उपाधी देतात. श्रीकृष्ण, बलराम, उद्धव हे आचार्य सांदीपनीच्या आश्रमात जाऊन चौसष्ट दिवसांत सर्व विद्या, कला यांची सखोल माहिती,शिक्षा घेतात. इथेच त्यांची सुदामाची भेट होते. कंसाचा सासरा जरासंध याच्या मथुरेवरील आक्रमणाचा सविस्तर वृत्तांत त्यांनी नमूद केला आहे. पद्मावत राज्यात जाऊन परशुरामाची भेट आणि आपला उत्तराधिकारी मानून श्रीकृष्णला परशुरामांनी सोपवलेल्या सुलक्षण सुदर्शन चक्राचा प्रसंग वाचताना गुंतवून ठेवतो. जीवनात कधी नव्हे ते रुक्मिणी स्वयंवरासाठी दंडकारण्य ओलांडून विदर्भातील क्रथकैशिकाचं राज्य स्वीकारून श्रीकृष्ण काही वेळेकरिता सिहंसनावर बसतो. पश्चिम सागरकिनाऱ्यावर आनर्त राज्यातील रैवतक पर्वताजवळील सौराष्ट्रात कुशस्थाली येथे द्विपावर भव्य नेत्रदीपक उभारलेल्या द्वारकेचा सविस्तर वृतांत वाचताना एक वेगळीच अनुभुती येते. दुसऱ्या स्वयंवरातून शिशुपालाला ताटकळत ठेवत स्वयंवरात भाग न घेता मंदिरातून रुक्मिणीचं केलेलं हरन, आणि द्वारकेत जाऊन केलेला लग्नसोहळा उरकण्याचा प्रसंग रोचक आहे.
श्रीकृष्णपत्नी #रुक्मिणी
या भागात रुक्मिणीच्या नजरेतून श्रीकृष्णाच्या पुढच्या सात लग्नांचा सविस्तर वृत्तांत नमूद केला आहे. त्यात जांबवती जी आदिवासी समाजातील होती, सत्यभामा, कालिंदी, लक्ष्मणा, भद्रा, मित्रविंदा, सत्या सोबतच त्यांच्या चार कन्या आणि ऐंशी पुत्रांचा समावेश आहे. नरकासुराचा वध करून त्याने कोंडलेल्या सोळा सहस्त्र स्त्रियांना मुक्त करून, समाज स्वीकार करायला तयार नसल्यामुळे, सर्व स्त्रियांचा पत्नी म्हणून स्वीकार करून त्यांचे द्वारकेत श्रीकृष्ण पुनर्वसन करतो. द्वारकेत सुदामा भेटीचा अत्यंत हळवा प्रसंग भावुक करतो. खंडववनात पांडवांसाठी इंद्रप्रस्थ उभारणीचा प्रसंग रोचक आहे. अर्जुनाने त्याची बहीण सुभद्रेला नाट्यमयरित्या पळवून नेऊन केलेल्या लग्नाचा प्रसंगही बोलका आहे.
श्रीकृष्णसारथी #दारूक
दारुकाची सकस आणि सुप्त अशी प्रभावी व्यक्तिरेखा आहे. श्रीकृष्ण, भीम, अर्जुन आणि सारथी दारूक यांनी गिरीवज्रतील जरासंधच्या नगरीत जाऊन, जरासंधाचा केलेला वध नाट्यमय आहे. इंद्रप्रस्तातील राजसूय यज्ञ, त्या यज्ञात शिशुपालाचा शंभर अपराध पूर्ण झाल्यावर केलेला वध सहनशक्तीची परिसीमा वाटते. सौभविमानासहित सौभपती शाल्व वध, त्याचवेळी सुदर्शन चक्रासाहित आपला शेला हस्तिनापुरच्या दिशेने पाठवून केलेले द्रौपदी लज्जारक्षण करणे, पुंड्र देशातील प्रतिवसुदेवाचा वध करून अहंकाराला नष्ट करणे, कुरुष राज्याचे रथी दंतवक्र व विधुरथ यांचा वध करणे असे प्रसंग या कादंबरीत आहेत. पूर्व सागराच्या किनाऱ्यावर उल्कल राजांनी त्या क्षेत्राला जगन्नाथपुरी नाव देऊन आणि कृष्ण, बलराम, उद्धव यांचे स्मरण रहावे म्हणून रथयात्रेची सुरवात केली. त्यातच हस्तिनापूरतील द्युतसभा आणि द्रौपदी वस्त्रहरण असे अशोभनीय प्रसंग वाचताना, प्रसंगी उपस्थितांनी विरतेला काळिमा फासल्याचे दृश्य नजरेसमोर उभे राहते. एक स्त्रीचा अपमान होत असताना आर्यावरतात मिरवणाऱ्या रथी महरथींची हृदये छंड कशी काय होऊ शकतात..!! असा प्रश्न निर्माण होतो. प्रयाग क्षेत्री दारूक, उद्धव, श्रीकृष्ण ऋषी अंगिरस यांच्या आश्रमात अंत न लागणाऱ्या मनाचा विषादयोगाची शिक्षा घेतात.
#द्रौपदी
पाच पांडवांच्या अन्य पत्नी, त्यांची मुले, त्यांचा स्वभाव द्रौपदीच्या दृष्टीने मांडलेला आहे. कुरुंच्या द्युतसभागृहात झालेली द्रौपदीची क्रूर विटंबना तिच्याही शब्दात नमूद केली आहे. तदनंतर पांडवांचा बारा वर्षाचा वनवास, कृष्णाच्या सल्ल्याने एक वर्षाचा अज्ञातवासाचे सविस्तर वृत्त या कादंबरीत आले आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रावर घडणाऱ्या महाभारताच्या प्रथम दिवसापर्यंतच्या घटनांचा तपशील तिला बोलतं करून त्यांनी घेतला आहे. जे युद्ध फक्त कौरव पांडवात नाही तर ते युद्ध होतं संपूर्ण आर्यावताचं, अन्यायाविरुद्ध न्यायचं, दमनाविरुद्धच्या दया क्षमेचं, असुरी विरुध्द मानवी शक्तीचं, असत्याविरुद्ध सत्याचं असं युद्ध आहे. स्त्रीची अवहेलना, धर्म हानी पुन्हा होऊ नये म्हणूनच सर्व उपायांती निरुपाय होऊन अंततः महाभारताच्या यज्ञाचे आयोजन झाले. तरीही आज अधर्म समाजात वावरतो आहेच ही शोकांतिका.
#अर्जुन
अर्जुनाचे इतर विवाहांचे वृतांत या भागात आले आहेत. हिमालयातील गंधमादन पर्वतावर जाऊन चार वर्षे तपस्या करून भगवान शिवाकडून पाशुपतास्त्र प्राप्त करण्याचा प्रसंग रोचक आहे. डोळ्यांना स्पष्ट दिसणारी घनदाट अरण्य वणवा पेटवून नष्ट करण्याचा जसा प्रसंग येतो तशी मानवी जीवनातील माजलेल्या अन्यायी अरेरावांची अरण्यही नष्ट करावी लागतात. जीवन त्याशिवाय प्रवाही होत नाही. नव्या राजनगरातसुद्धा नियोजनबद्ध सुंदर वनं उठवावी लागतात म्हणत, गीतेसारखं कालजयी तत्वज्ञान कुरुक्षेत्राच्या धरतीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले ते कादंबरीत अंशरूपाने आले आहे.
#सात्यकी यादव सेनेचा सेनापती
महापराक्रमी, अनुभवी अशी व्यक्तिरेखा. द्वाराकेतील कृष्ण परिवार, तेथील व्यवस्था त्यांच्या बोलण्यातून या कादंबरीत प्रसंगारुप मांडली आहे. महाभारतात पांडवांच्या बाजूने एक भागाचे सेनापती पद स्वीकारून, महाभारतातील अठरा दिवसांचा युद्धभूमीवरील प्रत्येक प्रसंग त्यांनी नमूद केला आहे.
श्रीकृष्ण चुलतबंधु #उद्धव
उद्धव ही व्यक्तिरेखा सर्वाधिक रससंपन्न आहे. महाभारताच्या युद्धानंतर दूतराष्ट्रासमोर भीमाचा लोहपुतळा उभा केल्याचा प्रसंग... तर महाराणी गांधारी देवीने श्रीकृष्णाला "कुठल्याही युद्धात तू विरगतीला न जाता, कुठल्यातरी रानावनात, कुणालाही कळणार नाही असा एकाकी मारुन पडशील" असा शाप देण्याचा कठीण प्रसंग आणि तो पूर्णत्वास जाणार प्रवास त्याच्या बोलण्यातून नमूद केला आहे. द्वारकेला आलेले महर्षी व्यास "पुढे भयाण सत्वपरिक्षेला सामोरे जावे लागेल." असे भविष्य त्यांना कथन करतात. तदनंतर आचार्य अंगिरस येऊन अर्जुनाला सांगितलेली गीता श्रीकृष्णकडून ऐकून तिचा प्रसार करण्यासाठी निघून जातात. तदनंतर ऋषी दुर्वास द्वारकेत येतात. श्रीकृष्ण पुत्र सांब त्यांची चेष्टा करतात. तो त्या ऋषीचा घनघोर अवमाणच होता. ऋषी दुर्वास "यादवांचा लवकरच विनाश होईल" असा शाप देतात. आणि एक दिवस कोजागिरीच्या चांदण्यात प्रलय माजतो. सगळे अठराकुलीन यादव मद्यधुंद होऊन आपापसात लढून लढून विनाश पावतात. त्यातून विषण्ण झालेला बलराम समुद्र किनारी पद्मासन घालून ध्यान धरतो आणि भरीतीमुळे सागरप्रिय होतो. पुढे श्रीकृष्णाचा अखेरचा प्रवास चालू होतो. त्या प्रवासात तो उद्भवला "उद्धवगीता" सांगतो. उद्धव माघारी फिरल्यावर, अखेर गांधारीच्या शापाप्रमाणे भालकातीर्थावरच्या अरण्यात एक झाडाखाली एका युगाचा अंत होतो. एकशे एक वर्षाचा अभूतपूर्व प्रवास संपतो.
प्रत्येकाच्या अंतरात एक कृष्णाचा अंश असतो, त्याला जाणून घेऊन दुसऱ्याच्या आयुष्यात सारथी बनून त्यांना जिंकवण्याचा प्रयन्त केला तर आयुष्याची प्रत्येक लढाई अगदी सहज जिंकता येईल. पण तो आपल्याला जाणवत नाही याचं कारण गेली कित्येक वर्षे एकाहून एक चमत्कारांनी कसा अंतर्बाह्य नुसता लडबडून गेला आहे ! भाबड्या अंधभावांच्या गुंतावळ्यात अडकून पडला आहे.
#युगंधर... #शिवाजी_सावंत
कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे
©____नित (नितेश पाटील)

Comments

Popular posts from this blog

हसरे_दुःख (भा. द. खेर) charlie chaplin hasare dukha

हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात Himalayatil mahatmyanchya sahavasat स्वामी राम

शकुंतला shakuntala