हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात Himalayatil mahatmyanchya sahavasat स्वामी राम

#हिमालयातील_महात्म्यांच्या_सहवासात
“Living with the Himalayan Masters” by Swami Rama या पुस्तकाचा, “स्वर्णलता भिशीकर” यांनी मराठीतून केलेला अनुवाद म्हणजे “हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात” हे पुस्तक. हे पुस्तक म्हणजेच प्रगाढ शांती असलेल्या रौद्रसुंदर हिमालयाच्या जिवंत शिखरांच्या वस्तीत, महात्म्यांच्या सहवासातील 'स्वामी राम' यांचा आध्यात्मिक प्रवास. त्या प्रवासात त्यांनी त्यांच्या गुरु आज्ञेने हिमालयातील अनेक साधूसंतांसमवेत राहून, त्यांना आलेल्या अनुभवाना यात शब्दरूप दिले आहे.

स्वामी राम यांचे वडील मोठे संस्कृत पंडित आणि अध्यात्म साधक होते. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांच्या गुरूंनी त्यांना संगितले की तुम्हाला मुलगा होईल तो मला द्यायचा आहे. बरोबर त्यानंतर अठरा महिन्यांनी त्यांना मुलगा झाला. ते स्वामी राम. तीन वर्षानी त्यांच्या गुरूंनी उजव्या कानात मंत्र सांगून स्वामी राम यांना अनुग्रह दिला. काही वर्षानी त्यांच्या मातापित्यांनी देह ठेवल्यावर ते गुरूंकडे निघून गेले आणि त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. त्यात त्यांनी करविरपिठाचे शंकराचार्य (1949 ते 1951) हे पदही भूषविले होते. पण साधनेसाठी वेळ नाही म्हणून ते दोन वर्षानी अक्षरशः तिथून पळून गेले होते.

या पुस्तकात त्यांच्या गुरुच्या सहाय्याने हिमालयातील गूढ गुफांमध्ये राहणारे सत्वपुरुष भेटल्यावर, आपल्या स्वरूपाची ओळख आपल्याला कशी होते याचा वृतांत कथेच्या माध्यमातून शब्दबद्ध केला आहे. हे महात्मे केवळ हिमालयातील एकाच ठिकाणचे नसून भारताच्या दूरस्थ भागांमधले, तिबेट, नेपाळ, सिक्किम आणि भुतानमधलेही आहेत. आणि तेथे तेथे जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे. मग तो त्यांचा प्रवास, प्रवासातील अनुभव त्यांनी शब्दात मांडला आहेत. त्या भेटींमध्ये अनेक चमत्कारही घडले आहेत. पण त्याच्या गुढतेकडे ते आपल्याला एक वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकवतात. काही वेळा चलाख चमत्कार आणि आध्यात्मिक सामर्थ्य यात त्यांची गफलत झालेली असते. त्या स्थितीतही ते पुढे जाऊन आपल्यापर्यंत आध्यात्मिक संदेश पोहचवतात. त्यांचा चमत्कारावर विश्वास नाही पण आपण एकंदरीत हा त्यांचा प्रवास पहिला तर लक्षात येईल की, त्यांचं आयुष्य चमत्कारिकच होतं. याची आपल्याला वाचताना अनुभूति येते.

हे पुस्तक वाचताना ते कधी आपल्याला एक हट्टी अवखळ मूल, कधी बेफिकीर तरुण, तर कधी थोर साधू संताच्या रूपात दिसतात. त्यांच्या दृष्टीने भूत, भविष्य, वर्तमान अशी काही काळाची विभागणी नव्हती. कायम ते वर्तमान काळातच जगलेले दिसतात. खरंतर स्वामीजींच हे पुस्तक म्हणजे एक चैतन्य आहे. यातला कोणताही अनुभव, कथा घ्या ती आपल्याशी संवाद साधते. त्यात त्यांना भेटलेल्या हरेक महात्म्यांच अस्तित्व आपल्याला जाणवतं. या आध्यात्मिक प्रवासात त्यांनी कैक प्रकारच्या साधना केल्या आहेत. त्यांच्या गुरूबद्दल त्यांना नितांत आदर, प्रेम आणि श्रद्धा होती. त्यांचे गुरु हे त्यांचे एकमेव मार्गदर्शक होते. पण चांगले गुरु भेटण्यासाठी शिष्यही त्याच तोलामोलाचा हवा. असं त्यांचं म्हणणं.

जीवनाच्या कळीचं फुलात रूपांतर होण्याचा काळ म्हणजे बाल्य आणि तारुण्य. त्या उमलत्या वयात मुलांकडे नीट लक्ष दिलं तर मुलांचा विकास होतो. लोकांच्या मतमतांतरानी मुलं गोंधळून जातात. अशा वेळी त्यांना योग्य गुरूंच मार्गदर्शन मिळावं यावर काही कथा या पुस्तकात आलेल्या आहेत. त्यांचं सार काढायचं झाल तर, निःस्वार्थ कृती नसेल तर सर्व कर्मकांड आणि पुस्तकी पांडित्य व्यर्थच आहे समजायचं.

यात त्यांनी आत्मसाक्षात्काराचा मार्ग, परमार्थ मार्ग सांगितला आहे. सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त होणं हा परमार्थ मार्गावरचा महत्वाचा टप्पा आहे. पण नेमकं उलट आपण बहुतांशी आपल्या मनातल्या भीतीमुळे देवाजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणाल तर त्याला आळवित असतो. आणि त्याचं मुळ कारण म्हणाल तर माणूस भूतकाळचा आणि भविष्यकाळाचा जास्त विचार करत असतो. त्याला वर्तमान काळात जागता येत नाही हेच त्याच्या दुःखाचं मुळ कारण असतं. दुःखाला आपला स्वार्थीपणाही कारणीभूत असतो. चित्ताचं संतुलन आणि शांति यामुळे दुःख नाहीसं होतं आणि आनंद मिळतो. पण ते संतुलन आणि शांति आपल्यालाच मिळवावी लागते. त्या प्रकारचा कुठलाही देव नसतो. आध्यात्मिक साधनेसाठी अखंड सावधानता लागते. यात लादलेली शिस्त फार उपयोगाची नसते. त्यातून साधकाला काय करावं हे कळलं तरी जीवन उमलतं कसं, स्वरूप उमगतं कसं हे कळत नाही. माणसाने भूतकाळात रेंगाळत न राहता वर्तमानात जगून प्रकाशपथाचा यात्रिक झालं पाहिजे. असे कितीतरी मुद्दे त्यांनी गुरु शिष्याच्या संवादातून आपल्यासमोर मांडलेले आहेत.

ज्ञान हे विविध प्रकारे मिळू शकतं. पण प्रत्यक्ष अनुभूतितून प्राप्त झालेलं ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान असतं, आणि त्याकडे नेणारा मार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग असतो. भ्रमभास हे अशुद्ध मनाला होत असतात, म्हणजेच आपल्या मनात शंका आहे तोवर आपण सत्यापासून दूर असतो. रोकडी स्वयंप्रचीतीच आपल्याला सत्य ज्ञानाच्या उगमाकडे घेऊन जाते. अर्धवट सत्य हे सत्य कधीच नसतं. खरं ज्ञान बोलण्यातून नव्हे तर असण्यातून–वागण्यातून व्यक्त होतं. महितीचा साठा म्हणजे ज्ञान नाही. असे उदाहरणासहित ज्ञानावर बरेसशे भाष्य या पुस्तकात आपल्याला अनुभवास येते.

मंत्रात खूप मोठी ताकत असते. पण जेव्हा मन शुद्ध आणि अंतर्मुख असतं, तेव्हाच मंत्र उत्तम काम देतात. अन्यथा अशुद्ध आणि असंस्कारित, साधनारहित मनाला भास होतात. मंत्राचा अर्थ नीट कळाल्याशिवाय त्यातील भावाचा उदय होत नाही आणि तो उत्कट भाव असल्याशिवाय यांत्रिक रीतीनं मंत्रोच्चारण फारसं उपयोगाचं नसतं. हे त्यांच्या अनुभवावरून घडलेल्या प्रसंगासहित ते आपल्याला सांगतात. हे सांगताना ते हे ही ठळक म्हणतात की, जर आध्यात्मिक व्यक्तीच्या जीवनात “निस्वार्थता” हा गुण आपल्याला दिसला नाही तर ती व्यक्ति आध्यात्मिक नव्हे.

लीनता अंगी बाणवणं हा एक दैवी गुण आहे. अध्यात्माच्या मार्गावरून चालताना लीनता आणि नम्रता अत्यंत आवश्यक आहे, पण मनात अहंकार निर्माण झाला की, तो त्यात अडथळे निर्माण करतो. आणि बर्याच वेळा एखाद्या क्षेत्रात तुम्ही नवखे असता आणि नाव नि किर्तिची अभिलाषा चित्तात असते तेव्हा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचा आत्यंतिक अभिमान वाटत असतो. पण त्यांच्या अनुभवातून तो प्रसंग उभा करून ते आपल्याला सांगतात की, जर असं असेल तर जेवढे अनुयायी जास्त तेवढा माणूस / साधू अहंकारी बनत जातो.

भीती हा साधकाचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणाल तर राक्षस. निर्भयता ही मुक्तिच्या मार्गावरची पहिली पायरी आहे. आणि आपण त्याच्या आसपासही नाही. आपली जन्म मृत्यूपासून सुटका नाहीच म्हणायची. पण त्यांची अनुभूती वाचल्यावर हा विचारही कुठेतरी मागे पडतो. नकारात्मक विचार करणारं मन हा आपल्या आत लपलेला सर्वात मोठा राक्षस आहे. पण तरीही नकारात्मकतेचं रूपांतर सकारात्मकतेत करणं मनुष्याला संभव आहे. कारण सर्व भय आणि संभ्रम हे प्रत्यक्ष अनुभवामुळे दूर होतात. आणि त्यासाठी नैसर्गिक प्रेरणा ही खूप मोठी शक्ति असते.

संन्यास मार्ग हा प्रत्येकासाठी नाही. तो धारदार पात्यावरून चालण्यासारखा आहे. तो काही भाग्यवंतांसाठीच आहे. असं असलं आणि स्वतः ते संन्यास मार्गावर असले तरी, संसारात राहून कर्म करीत साधना करणार्या मार्गाला ते तुच्छ लेखत नाहीत. साधक कोणत्या मार्गाने जातो हे त्यांच्यासाठी महत्वाचं नाही. स्वीकृत मार्गात किती प्रामाणिकपणे, निष्ठेने, सत्याने आणि श्रद्धेने चालतो हे महत्वाचं आहे. म्हणून त्यांच्या मते दोन्ही मार्गात श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नाही. निस्वार्थ कर्मावर ज्यांची श्रद्धा आहे, त्यांच्यासाठी कर्मयोग हा मार्ग आहे.

एका दुर्दैवी प्रयोगानंतर त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या एका गोष्टीचा दाखला दिला आहे. ती म्हणजे, “दैव हे चंचल वारांगणेसारखं असतं. जेव्हा तुम्ही त्याच्या मागे धावता तेव्हा ते तुम्हाला हुलकावण्या देतं. पण ज्या वेळी तुम्हाला त्यात रस नाही असं त्याला कळतं तेव्हा ते तुम्हाला शोधत तुमचा पाठलाग करत येतं.” आणि म्हणून आपलं आंतरिक जीवन आणि बाह्य जीवन यांच्यात सुसंवाद असला पाहिजे. आणि त्याचा पाया म्हणजे स्वयंशासन. शेवटी आपल्या भोवती चाललेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाहीत. आपला भोवताल, आपला समाज आपल्यासाठी अनुकूलच असेल असं नाही. पण आपल्याकडे सामर्थ्य आणि दृढसंपल्क असेल तर आपण जीवनाच्या यात्रेत यशस्वी रीतीने पुढे जाऊ शकतो. असे मर्म आपल्याला या पुस्तकातून घेता येईल.
प्रथम माणसाने आपली आंतरिक सिद्धता किती हे समजून घ्यावं आणि मग आपल्याला योग्य असेल त्या मार्गाने साधना करावी. हृदय हा सागर आहे. त्यातल्या शिंपल्यात ज्ञानाचा मोती आहे. खोलवर सुर मारली म्हणजे तो मोती आपल्याला मिळत असतो. संसारात एखाद्या वस्तूचा त्याग करायला पाहिजे असं काही नाही. तर त्या वस्तूप्रती आपली असलेली स्वामीत्वाची भावना आपण सोडली पाहिजे. मग तो आपल्या अंतरातील ज्ञानाचा मोती का असेना !!

या जगात खरा वैश्विक धर्म कुठला असेल तर तो ‘प्रेमधर्म’ आहे. आजचा माणूस त्याच्या स्वतःच्या प्रश्नांनी जितका गोंधळलेला नाही तितका उपदेशकांच्या प्रतिपादनांनी गोंधळलेला आहे. सामाजिक आणि धार्मिक प्रश्न गंभीर संघर्ष, कडवट पूरग्रह निर्माण करीत आहेत. पूरग्रह हे असं विषारी रसायन आहे की त्यामुळे मनुष्याच्या विकासाला खीळ पडते. प्रेम हे समावेशक असतं. त्यामुळे जगातील सर्वश्रेष्ठ धर्माचा पाया प्रेमात असलेला आपल्याला दिसतो. कसोटीच्या प्रसंगी बहुतेक लोक गंभीर होतात. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत, सर्व प्रसंगी आनंदी राहणं फार महत्वाचं आहे. निस्वार्थ प्रेमाने केलेलं सर्व कर्म मुक्तिला कारण होतं. पूर्णत्व हे मानवी जीवनाचं ध्येय आहे परंतु त्यासाठी मानवाने कितीही प्रयत्न केले तरी त्याला सीमा आहे. केवळ मानवी प्रयत्नाने परमानंदाची प्राप्ती होत नाही. त्यासाठी ईशकृपा आणि गुरुकृपा लाभते. ज्यांना ती लाभली ते धन्य होत.

खरंतर हे पुस्तक नसून ज्ञानाचा भंडार आहे. त्यात त्यांनी चौदा भागांमध्ये वर्गीकरण केले आहे. त्यातही एकशेएकवीस सत्य कथानुभवातून, त्यातील महात्म्यांनी मानवजातीवर किती निरपेक्ष, निःस्वार्थ प्रेम केलं याची प्रचिती आपल्यासमोर शब्दरूपात मंडलेली आहे. हे पुस्तक वाचून ज्ञानाबरोबरच आपल्याला नक्कीच ऊर्जा मिळेल.
©___ नितेश पाटील नित

Comments

Popular posts from this blog

हसरे_दुःख (भा. द. खेर) charlie chaplin hasare dukha

शकुंतला shakuntala