शकुंतला shakuntala

शकुंतला
शकुंतला ही कादंबरी महाकवी कालिदास यांच्या 'शाकुंतल' या नाटकाचा भावानुवाद आहे. शाकुंतल ही संस्कृत मधील सर्वश्रेष्ठ कलाकृती मानली जाते. महाकवीच्या आशयातून आनंद साधले यांनी त्यांच्या भाषेत ती प्रस्तुत केली आहे. मूळ संस्कृत भाषेतील या पुस्तकाचे त्यांनी शब्दशः भाषांतर केलेले नाही. तिला कादंबरीच्या कथानकात ढाळण्यासाठी त्यांनी मूळ आशयाचे सौंदर्य तसेच ठेऊन अगदी सुरेख शब्दसंगती केली आहे. तसे शाकुंतल हे नाटक सर्वपरिचित आहे. पण तरीही पुस्तक वाचताना आपण अजूनच रसिक होऊन जातो. यातील स्थळांचे निसर्ग सौंदर्य आणि एकेक पात्र वाचताना आपण त्या रसगंधी उद्यानात स्वतः असल्याचा भास होतो. शकुंतलेचे रम्य व्यक्तिमत्व आपल्याला तिथेच गुंतवून ठेवते.

शकुंतला ही विश्वामित्र आणि मेनकेची कन्या. पण ती वाढली हिमालयाच्या उतारावरील पुण्यभूमीत, मालिनी नदीच्या तीरावरील कण्व महर्षींच्या आश्रमात, त्यांची कन्या म्हणून. तिथे त्या वेळचा हस्तिनापुरचा सम्राट राजा दृष्यंत शिकार करता करता महर्षींच्या तपोभूमीत प्रवेश करतो. कुलपतींच्या गैरहजेरीत त्यांची कर्तव्य सांभाळणारी त्यांची कन्या शकुंतला हिच्याशी त्याची भेट होते. तिच्याशी गांधर्व विवाह तो करतो. त्याची आठवण म्हणून तो तिला अंगठी देतो. ती गरोदर राहते. त्यानंतर सर्व मुनींनी ज्यांचा संताप ज्या एकट्या दुर्वास ऋषींना दिलाय, त्यांचा शकुंतलेला शाप आणि तिची मैत्रिण प्रियवंदेच्या विनंतीवरून शकुंतलेच्या मुक्तीचा मार्ग ते तिला सांगून जातात. त्या शापाने दृष्यंत सारे विसरून जातो. 

आठ महिन्यानंतर महर्षी कण्व आश्रमात येऊन तिची पाठवणी करतात. पण जिथे प्रीती तेथे विरहाची वेदना असतेच. राजा दृष्यंत सारं काही विसरलेला असतो. तो तिचा स्वीकार करत नाही. हा प्रसंग तिला विलक्षण वेदना देऊन जातो. पृथ्वीने तिला पोटात घ्यावे असे तिला वाटते. ती जन्मदात्या आईला स्मरते आणि अप्सरातीर्थाच्या दिशेने एक प्रकाशलोळ येऊन तिला घेऊन जातो. हे प्रसंग अगदी जागे केलेले आहेत.

तदनंतर लगेचच ती अंगठी राजाच्या समोर येते. त्याला सर्व आठवते. ती जेव्हा त्याच्यासमोर भरल्या अश्रूने, एखाद्या गरीब गाईसारखी त्याच्याकडे दिनपणे पाहत होती, तेव्हा त्याने तिची राक्षसाच्या क्रूरपणणाने उपेक्षा केल्याचा त्याला पच्छाताप होतो. पण तोवर वेळ निघून गेलेली असते. आयुष्याच्या वाळवंटात स्वच्छ सुंदर पाण्याने खळाळणारा झरा समोर यावा आणि तो आंधळेपणाने ओलांडून जीवनाच्या मरुभूमीत, तहानेने व्याकुळ होऊन मृगजळाच्या मागे धावावे अशी राजा दृष्यंताची गत होते. 

वर्षामागे वर्ष सरतात. सात वर्षाचा हा काळ, पुढचा इंद्र आणि मारीच ऋषींच्या भेटीपर्यंतचा प्रवास, राजा दृष्यंत आणि शकुंतलेची भेट, त्यांचा पुत्र सर्वमर्दन, जो पुढे जाऊन चक्रवर्ती सम्राट होईल आणि भरत म्हणून ओळखला जाईल असे ऋषींचे भाकीत अशी ही कादंबरी वाचनीय आहे. या कादंबरीत रंगवलेली सौंदरस्थळे भुरळ पडणारी आहेत. रातराणीच्या गंधाप्रमाणे ते सौंदर्य वाचताना आपणहून ती आपल्या रसवृत्तीला भिडत जाते. 
©___नित (नितेश पाटील)

Comments

Popular posts from this blog

हसरे_दुःख (भा. द. खेर) charlie chaplin hasare dukha

हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात Himalayatil mahatmyanchya sahavasat स्वामी राम