Posts

Showing posts from August, 2020

शकुंतला shakuntala

Image
शकुंतला शकुंतला ही कादंबरी महाकवी कालिदास यांच्या 'शाकुंतल' या नाटकाचा भावानुवाद आहे. शाकुंतल ही संस्कृत मधील सर्वश्रेष्ठ कलाकृती मानली जाते. महाकवीच्या आशयातून आनंद साधले यांनी त्यांच्या भाषेत ती प्रस्तुत केली आहे. मूळ संस्कृत भाषेतील या पुस्तकाचे त्यांनी शब्दशः भाषांतर केलेले नाही. तिला कादंबरीच्या कथानकात ढाळण्यासाठी त्यांनी मूळ आशयाचे सौंदर्य तसेच ठेऊन अगदी सुरेख शब्दसंगती केली आहे. तसे शाकुंतल हे नाटक सर्वपरिचित आहे. पण तरीही पुस्तक वाचताना आपण अजूनच रसिक होऊन जातो. यातील स्थळांचे निसर्ग सौंदर्य आणि एकेक पात्र वाचताना आपण त्या रसगंधी उद्यानात स्वतः असल्याचा भास होतो. शकुंतलेचे रम्य व्यक्तिमत्व आपल्याला तिथेच गुंतवून ठेवते. शकुंतला ही विश्वामित्र आणि मेनकेची कन्या. पण ती वाढली हिमालयाच्या उतारावरील पुण्यभूमीत, मालिनी नदीच्या तीरावरील कण्व महर्षींच्या आश्रमात, त्यांची कन्या म्हणून. तिथे त्या वेळचा हस्तिनापुरचा सम्राट राजा दृष्यंत शिकार करता करता महर्षींच्या तपोभूमीत प्रवेश करतो. कुलपतींच्या गैरहजेरीत त्यांची कर्तव्य सांभाळणारी त्यांची कन्या शकुंतला हिच्याशी त्याची भेट होते.