मृत्युंजय Mrutyunjay

#मृत्युंजय
ही कादंबरी आहे मृत्यूच्या भीतीवर जय मिळवणाऱ्या पण अखंडित संभ्रमित असणाऱ्या कर्णाची. सर्वपरिचित अशी कादंबरी... तब्बल ३७ ग्रंथातील संदर्भ घेऊन, त्याचं चिंतन, मनन करून शिवाजी सावंत यांनी अलंकारिक भाषेत ही कादंबरी लिहली. आणि या कादंबरीने साहित्यविश्वातील अनेक विक्रम मोडले.
कादंबरीची सुरवातच अशी आहे की "आज मला काही बोलायचं आहे." कालवश माणसं केव्हा बोलतात तर, जेव्हा जेव्हा हाडामांसाची जिवंत माणसं मृतांसारखी वागतात तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागत. या वाक्यातच किती जिवंतपणा आहे. मनाच्या सखोल, गहनगंभीर गाभाऱ्यातून कर्णाला एक आवाज स्पष्ट ऐकू येतो. आणि त्यानुसार आयुष्याच्या भात्यातील विविध घटनांचे बाण मोकळ्या मनाने त्याला सर्वांना दाखवायचे, आपली जीवनकथा सर्वांना सांगावी असे म्हणून सुरवात होते.
महाराज शत्रुघ्नच्या पुण्यवान नगरात, मथुरेत आपलं बालपण जगेलेली पृथु. पुढे तिचे वडील मथुरेचे यादवराज शुरसेन यांनी त्याचा भोजपुर नगरातील आतेभाऊ कुंतीभोज याला दिलेला शब्द पाळून तिला त्याच्या स्वाधीन करतात. आणि ती भोजपुर नगरात राहू लागते. त्यांच्या नावावरून तिला ते कुंती या नावाने आणि आजही हे जग तिला कुंती याच नावाने ओळखते. एकेका घटनेत माणसाला नखशिखान्त बदलण्याचं किती प्रचंड सामर्थ्य असतं हे तिने तिथे राहून सिद्ध केले.
भोजपुरात एक महायज्ञ करण्याच्या हेतूने हिमालयात घोर तपश्चर्या करून, मनाचं दिव्य सामर्थ्य मिळवून ऋषी दुर्वासा आले होते. आर्यवर्ताच्या सर्व कोपिष्ट ऋषींचा कोप ज्यांच्या कमंडलूत सहज सामावला असता असे ऋषी दुर्वास. "जिथं वैभवाचा विलास असतो तिथं आत्म्याचा विनाश असतो." असं म्हणून राजवड्याबाहेर ते परणकुटीत यज्ञ करतात. त्या दरम्यान कुंतीभोज राजाची मानसकन्या कुंती, जी शुरसेन राजाची कन्या होती, ती त्यांची सेवा करते. त्या सेवच फळ म्हणून तिला मंत्र देतात. "सगळं जग तुला यापुढं वीरांची जननी म्हणून ओळखेल. ज्या ज्या शक्तींची स्मरण करून तू हे मंत्र म्हणशील ती ती शक्ती मानवरूपात क्षणात दासासारखी तुझ्या समोर उभी राहील आणि तुझ्या पोटी आपल्यासारखाच तेजस्वी पुत्र निर्माण करून निघून जाईल. ही दुर्वासाची वाणी आहे."
काही दिवसांनी तेजस्वी सूर्याला पाहून तिच्या मनात एक विचित्र विचार येतो. त्या मंत्राचं सामर्थ्य पाहण्यासाठी, तिच्या दृष्टीने अशक्य म्हणून त्या तेजस्वी शक्तीचं, सूर्याचं स्मरण करून ती मंत्र म्हणते. दुर्वासाची वाणी व्यर्थ जाणारी नव्हती. ती गरोदर राहते.
मातृत्व हा स्त्रीला मिळणारा सर्वात श्रेष्ठ वर असला तरी कौमार्यावस्थेत माता होणं हा एक शापासारखा असतो.
"वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं आणि विरकन्यांनी शीलासाठी मरावं." हे तिच्या वडिलांचे अमृताचे बोल ती विसरली नव्हती. वैदराजाना सांगून दुर्वासा ऋषींच्या यज्ञाची सांगता करण्यासाठी जगातलं सगळ्यात दाहक विष मला आणून दे म्हणून आज्ञा करते. आणि प्राशन करते. पण मृत्यूसुद्धा आपली कृपादृष्टी माणसावर हवी तेव्हा वळवायला कुठे तयार असतो ?
एका मध्यरात्री प्रसूतीवेदनेच्या मुशीतून तापून निघालेलं, उगवत्या सुर्यासारखं, देखण रूप तिच्या झोळीत पडलं. पण त्याचा त्याग केल्याशिवाय तिला गत्यंतर नव्हतं. प्रेम आणि व्यवहार, कर्तव्य आणि भावना, वास्तवता आणि ममता या द्वंदात सापडून तिची शारीरिक आणि मानसिक कोंडी झाली. आणि त्याला एका पेटीकेत टाकून उजाडण्यापूर्वी अश्वनदीच्या पात्रात सोडून दिले. ती पेटीका अश्वनदीतून चर्मवती, यमुना, गंगा असा प्रवास करत करत प्रयगराज च्या पुढे अंगदेशातील चंपानगरी जवळ गेली. ती एक सारथ्यान बाहेर काढली. तेव्हापासून कर्ण तिथे सर्थ्याचा पुत्र म्हणूनच वाढला.
चंपानगर या गावी आपला भाऊ शोण आणि आई बरोबर राहत असताना, गावातील बरेच निसर्गानुभवांचे दाखले दिले गेलेत. जे त्याच्या जीवनाशी अत्यंत निगडित आहेत. कर्ण गावातील वटवृक्षाखाली पक्षी पाहत असताना भगदत्त नावाचा त्यांचा शेजारी येऊन त्याला म्हणतो, "पक्षी पहायचे असतील तर अरण्यात अशोकाच्या वृक्षाजवळ जायला हवे. या वटवृक्षावर फक्त कावळेच असतात, असलाच तर चुकून एखादा कोकीळ तोही कोकिळेच्या धुर्तपणामुळे." ती धूर्त कल्पना जरी खोटी नसेल, तरी वसंत ऋतूचा योग्य काळ येताच त्याची सप्त स्वरातील तान इतर पक्षांना ओरडून सांगतेच सांगते की मी कोकीळ आहे. कर्णाच्या बाबतीत किती भावुक उदाहरण आहे हे...
त्याचप्रमाणे हस्तिनापूरच्या नगरात फिरत असताना, कुंतीच्या रथाखाली येता येता शोण ने वाचवलेलं मांजरीचं पिल्लू. ते दृश्य पाहताना... आपल्या पोराला एकटं टाकून ती मांजर कुठं भटकत होती...?? हा कर्णाच्या मनात आलेला प्रश्न. तसेच कुंतीच्या रथाला सहा घोडे जोडण्याची निट व्यवस्था असतानाही केवळ पाचच घोडे जोडले होते..!! एका घोड्याची जागा तशीच का मोकळी सोडली होती. ते पाहताना... राजवड्यावरचे घोडे संपले की काय..?? असे स्वतःशीच पुटपुटणारा कर्ण. अशी अनेक उदाहरणं या कादंबरीत आहेत, ज्यात कर्णाच्या मनःस्थितीची घालमेल जाणवते.
हस्तिनापूर मध्ये झालेल्या योद्धयांच्या परीक्षेत विजयी होऊनही, तो सुतपुत्र म्हणून हिनवला जातो. त्याचा पराक्रम पाहून पांडवांना कोण थोपवू शकणार असेल तर तो कर्णच होता हे अचूक ओळखून, त्या परिस्तिथीचा फायदा घेऊन, पांडवांचा काटा काढायचा या उद्देशाने तो तेजस्वी आणि पराक्रमी कर्णाला अंगदेशाचा अभिषिक्त राजा करतो. आणि कर्ण दुर्योधनाला वचन देतो की, "ज्या मेरूपर्वताच्या धेर्यांनं आज तू मला सावरलंस त्याच धेर्यांनं मी आजन्म तुझ्या पाठीशी राहीन ! प्राण गेला तरी कधीही परतणार नाही !
दुर्योधन पांडवांना महाराज पांडुचे पुत्र मानतच नव्हता, एकतर ते कौंतेय असू शकतात पण पांडव नाहीत. किंदम ऋषीच्या शापामुळे त्यांना पुत्र होऊच शकत नाही असा त्याचा दृढ समज होता. म्हणूनच त्यांनी मथुरेला जाऊन श्रीकृष्णाबरोबर भांडावं, या हस्तिनापुरात ते उद्धत अधिकारान आपलं तोंड का खुपसत आहेत असा त्याच्यासमोर प्रश्न होता. आणि म्हणूनच वारणावताच्या जंगलात हवापालटासाठी आणि वनविहारासाठी गेलेल्या पांडवांना कुंतीसहित, लाक्षागृह तयार करून त्यांना जाळून मारण्याची योजना आखतो. आपल्या निकट सहायकाला, पुरोचनाला ती जबाबदारी देतो. ते मनोरथ पूर्ण झाल्याची बातमी घेऊन पुरोचनाचा दूत येतो.
पांचाल देशाची युवराज्ञी याज्ञसेनी, द्रुपद राजाची रूपवर्गीता कन्या द्रौपदीच्या स्वयंवराची वार्ता ऐकून दुर्योधनाच्या मनाची कारंजी उफाळून उधळू लागतात. स्वयंवरात द्रुपदानी मांडलेला पण हे अर्जुन आणि कर्णच पूर्ण करू शकतात याची त्याला खात्री होती. म्हणूनच तो पण कर्णानी आपल्यासाठी जिंकावा असे सांगून तो कर्णासह तिथे गेला. कारण अर्जुन तर आता हयात नाही असा त्याचा समज होता. तिथेही द्रौपदी कर्णाला सुतपुत्र म्हणून तुला भाग घेता येणार नाही, मी सारथ्याची पत्नी होऊ इच्छित नाही असे अपमानित करते. आणि ब्राम्हण वेशातील अर्जुन तो पण जिंकतो. अर्जुनाची ओळख पटल्यामुळे कर्ण आणि अर्जुन यांच्या झालेल्या युद्धाचे कर्णाचा पुत्र सुदामन मारला जातो. ते हस्तिनापूरला माघारी येतात.
काही दिवसानी पांडवही येतात. पांडवांना हस्तिनापूरात न राहू देता त्यांना खंडाववनात जाण्यास सांगितले जाते. तिथे त्यांनी इंद्रप्रस्थ राज्य निर्माण केलं. हस्तिनापूर हे पूर्वज्यांच्या पराक्रमाचं तर इंद्रप्रस्थ हे पांडवांच्या स्वकर्तृत्वाचं राज्य होतं. पांडवांनी राजसूय यज्ञ केला तेव्हा सर्वांना आमंत्रित केले होते. इंद्रप्रस्तातील राजवाड्याच्या भिंतीवर चितारले अनेकोनेक भावप्रसंग होते. त्यातील कुंतीने खासकरून मथुरेचे चित्रकार आणवून रेखाटून घेतलेला एक प्रसंग (जो की कर्ण जन्मवेळचा होता) पाहून कर्ण पुन्हा संभ्रमित होतो. त्या चित्राचा त्याला काही केल्या अर्थबोध होत नाही. पण त्यातील आर्तता, गुढरम्यता, असहायता त्याचे कुतूहल वाढवत होती. त्यात चितारलेल्या पेटीत काय होते या प्रश्नच उत्तर देताना, कुंतीदेवी म्हणाल्या होत्या की ते एकट्या ऋषी दुर्वासाना माहीत आहे. अशी माहिती त्याला अमात्यांनी दिली.
पूर्ण राजवाडा पाहून ते शेवटच्या मायावी दालनात गेले. तिथे दुर्योधन पाण्यावर काढलेल्या फसव्या रांगोळीवर पाय टाकतो आणि पाण्यात तोंडघशी पडतो. तेवढ्यात दुर्योधनावर तिरस्काराचा कटाक्ष टाकून आपल्या सखींना उद्देशून द्रौपदी खोचकपणे म्हणते, " अंध पित्याचे पुत्रही अंधच असतात म्हणायचे..!!" दुर्योधनावरचा तिचा क्रोध तिनं त्याचा असा अंधपित्याचा नैसर्गिक व्यंगचा मर्मभेदक उल्लेख केल्याने, त्या कुत्सित आणि खोचक उद्गाराची कर्णाला किळस येते. तिच्या कुशेष्ठेने बिथरलेला दुर्योधन कडाडून तिला म्हणतो, "अंध पित्याचे पुत्र डोळस असतात हे प्रसंग येईल तेव्हाच तुला कृतीनं दाखवून देईन."
पुढे यज्ञाची सुरवात होताच, शिशुपाल आपल्या आसनावरून उठून युधिष्ठिरावर नजर रोखुन म्हणतो, "कुरुंच्या श्रेष्ठ कुलात जन्मलेल्या युधिष्ठिरा, एका गवळ्याच्या पोराला या महान यज्ञाचा यज्ञवेत्ता करून तू इथं या आर्यावर्तातल्या समस्त शूर क्षत्रियांची आमंत्रण देऊन कुचेष्टा मांडली आहेस काय ? जरासंधाचा सेनापती म्हणून आणि रुक्मिणीचा विवाहपूर्व अयशस्वी वर म्हणून त्याला श्रीकृष्णावर प्रतिशोध घ्यायचा होता. श्रीकृष्णाची कुणी कधी केली नसेल आणि ऐकली नसेल अशी असह्य अवहेलना त्याने केली. सागराच्या भरतीलाही फुगण्याची एक सीमा असते. त्याचे शंभर अपराध पूर्ण होण्याची वाट पाहत असलेल्या श्रीकृष्णाने ते पूर्ण होताच, आपल्या सुदर्शन चक्राने क्षत्रियत्वाच्या खोट्या अहंतेने उन्मत्त झालेल्या शिशुपालाचे शीर धडापासून वेगळे करतो. सत्य आणि किमयेच्या संभ्रमात पडलेल्या कर्णाला त्या दाहक चक्राने आणि श्रीकृष्णाच्या वृद्धिंगत होणाऱ्या शरीराबरोबर आपले शरीर का तप्त झाले असा प्रश्न पडतो.
हस्तिनापुरात आलेला दुर्योधन तिथे घडलेल्या अप्रिय घटना विसरू शकत नव्हता. त्याचा बदला घेण्यासाठी मामा शकुनी द्युताच्या चार पट्ट्यात केवल पांडवच नाही तर पांचाली आणि कुंतीदेवीलाही गुंडाळण्याची अत्यर्क स्वप्न दाखवतो. त्यासाठी राजसूय यज्ञापेक्षा भव्य विष्णुयाग यज्ञासाठी पांडवांना आमंत्रित करतो. यज्ञ मंडपात समिधा पडण्याऐवजी राजसभेत शकुनी मामा आणि युधिष्ठिर फासे टाकतात. ज्याला कर्णाने द्वंदात जीवदान दिले अशा भिमवधीत जरासंधाच्या हाडाच्या कवड्या द्यूतासाठी मामा शकुनी वापरतो. त्यांच्या आवाजाने त्या थरथरत असल्यामुळे कर्णाला योजनापूर्वक यज्ञासाठी गंगेकिनारी सूर्याला अर्ध्य देण्यासाठी पाठवतात. युधिष्ठिर द्यूतात सर्व हरतो.
द्रौपदीला दासी करून भर राजसभेत तिचा अपमान केला जातो. तिला विवस्त्र करून दुर्योधन आपल्या मांडीवर बसवण्याची आज्ञा दुःशासनाला करतो. कितीतरी तीव्र इच्छा असली तरी जीवन कुणालाही कधीच मागे नेता येत नाही. ते दिसेल तसं बघावं लागतं. असेल तसं जगावं लागतं. सभागृहातल्या सर्व सभासदांना ती आक्रोशात हाकारत होती. हंबरड्याच्या आर्ततेने सारेच दचकले पण कोणीही तिच्या याचनेची दखल घेतली नाही. तोच दुर्योधनाचा एक भाऊ विकर्ण उठतो, आपल्यापेक्षा वडील असलेल्या दुःशासनाला अधिकारवाणीने म्हणतो की, "दुःशासना अनेक महाराण्यांनी भूषविलेली ही राजसभा आहे. पांचालीच्या शरीराला स्पर्श करू नकोस." पण विकर्णाला मूर्ख ठरवून, "पांचाली पाच पतींशी रमणारी विलासिनी, कलंकिनी, वारांगना, कुलटा आहे. अशा स्त्रीला पाच पेक्षा एकशे पाच पतीच प्रिय असतात. ती सवस्त्र सभागृहात आली काय आणि विवस्त्र आली काय, सारखीच !" असे विषारी बोल यथेच्छ मद्य प्यालेल्या धुंद मद्यप्यासारखा कर्ण बोलतो. असा हा सूड भावनेनं ग्रासलेला... सदा संभ्रमित असलेला कर्ण. तिथे सर्वांनी शरीराचे डोळे मिटले असावेत पण मनाचे डोळे कसे मिटता आले हा प्रश्न आहे. असो... तिथे श्रीकृष्णाने द्रौपदीची वस्त्र राखली.
झाल्या प्रकारानंतर पांडव वनवासाला निघून गेले. कर्ण दिग्विजयासाठी बाहेर पडतो. सहा महिन्यांनी कर्ण दिग्विजयी योद्धा होऊन परततो. कुरुंच्या राज्याला अफाट कीर्ती मिळवून देतो. पण दुर्योधनाला कर्ण अर्जुनाला मात देईल की नाही ही शंका असते. तसा तो, दुःशासन आणि मामा त्याला मद्य पिऊन चिथवतता. कर्णही मग तेवढ्यात तुमचं समाधान होत नसेल तर मि दानधर्माने माझी पुण्याई वाढवेन असं म्हणून दानशूर होतो. आणि इंद्र ब्राह्मण वेशात येऊन त्याची कवच आणि कुंडले दान म्हणून मागतो. त्याची पूर्वकल्पना असूनही तो ते दान करतो. दुर्योधनाला त्याचा धक्का बसतो. "आता कवच कुंडलाशिवाय कर्ण म्हणजे, फण्याशिवाय भुजंग ! आयाळीशिवाय सिंह! शिखरशिवाय हिमालय ! आता अर्जुनासमोर तू युद्धात कसा काय उभा राहणार ?
तो गुरू द्रोणाकडे त्याला ब्रह्मस्त्र शिक्षा घेण्यास सांगतो. गुरू द्रोण त्याला क्षत्रिय नाही म्हणून ती शिक्षा देत नाहीत. म्हणून तो महेंद्र पर्वतावर निवासीत भगवान परशुराम यांना, मी भृगु कुळातला असून माझं नाव भार्गव आहे असं खोटं बोलून शिक्षा घेत असतो. त्याचदरम्यान तो मृगयेसाठी जंगलात गेला असता त्याच्या अमोघ बाणाने गाय मारली जाते. तेव्हा "योद्धा योद्धा म्हणून गाईवर बाण टाकणाऱ्या अधमा, तुझ्या रथाचं चक्रही ऐन युद्धाच्या वेळी भूमीत रुतून बसेल." असा शाप आपल्या गाईच्या मस्तकात घुसलेल्या बाणाकडे पाहून एक वृद्ध ब्राह्मण त्याला देतो. त्या शापाने सगळं जीवनच कुठेतरी रुतून बसलंय असं त्याला वाटते.
पुढे त्याला सामर्थ्यशाली ब्रह्मस्त्राची विद्याही भगवान परशुराम स्वाधीन करतात. आणि त्याला त्यांच्याबरोबर कलिंग राज्यात येण्यास सांगतात. यावेळेस मात्र त्याला नाकारता येत नाही. वाटेत ऋषींना काही वेळ विश्राम करण्याची इच्छा होते. त्यांच्या मस्तकाखाली आधारासाठी जेव्हा ते पाषाण मागतात तेव्हा कर्ण त्यांचे मस्तक आपल्या मांडीवर ठेवतो. तेव्हा ते त्याला अभिमानानं सांगतात, "भार्गव, हीच तुझी गुरुदक्षिणा मानतो मी ! पण निद्रा पूर्ण झाल्याशिवाय मला उठवू नकोस ! निद्रा आणि वचन कधीच अपूर्ण राहू देऊ नयेत!"
काही क्षणातच एक तीक्ष्ण दाताचा काळा कीटक कर्णाची मांडी करकचून चावू लागतो. निर्धाराने तो सहन करतो, पण उष्ण रक्ताच्या स्पर्शाने ऋषी खडबडून जागे होतात. त्या किटकाने त्याची मांडी पूर्णपणे पोखरून त्याच्या भवीतव्यालाच छिद्र पाडलं होतं. "इतकी सहनशीलता ! तू ब्रह्मकुमार नाहीस. खर बोल तू कोण आहेस ?" तेव्हा कर्ण आपली ओळख देतो सुतपुत्र कर्ण म्हणून... आणि असत्य बोलून विद्या घेतली म्हणून भगवान परशुराम त्याला म्हणतात, "लक्षात ठेव असत्य हे असत्यच ! ज्या ब्रह्मस्त्रासाठी तुला, मला ही असत्य सांगण्याची दुर्बुद्धी झाली ते ब्रह्मस्त्र तुला ऐन युद्धप्रसंगी स्मरणार नाही." नियतीचा खेळ कसा असतो ! कीटकाच्या रुपानं त्यानं कर्णाच्या दिग्विजयला, दानशूरत्वाला पोखरलं होतं. शापित विद्या आणि भग्न हृदय घेऊन कर्ण हस्तिनापुरात परततो.
पांडवांकडून संधीचा प्रस्ताव घेऊन श्रीकृष्ण हस्तिनापुरात येतो. त्याआधीच कर्ण दुर्योधनाला तो प्रस्ताव अस्वीकार करून पांडवांना युद्धाचं आमंत्रण देण्यास सांग अशी इच्छा प्रकट करतो. श्रीकृष्ण येऊन पांडवांना अर्ध राज्य देऊन भावीतव्यातील विध्वंसाचा विराट वणवा विझवून टाक असा प्रस्ताव मांडतो. पण पांडवांना अर्ध काय पण सुईच्या अग्रावर थरथरत राहणाऱ्या धुळीकना एवढेही राज्य, कधीच युध्दाशिवाय मिळणार नाही, असे दुर्योधन ठणकावून सांगतो. आणि कृष्णाचा भर सभेत अपमान करतो.
युद्ध ! युद्धानं कुणाचेही प्रश्न मिटणार नाहीत. युद्ध हा मानवी कौर्य उखडून काढण्यासाठी योजावा लागणारा, पण तेवढाच कठोर अंतिम उपाय आहे. असं म्हणून या युद्धात मी शस्त्र उचलणार नाही असा पण घेऊन श्रीकृष्ण तिथून कर्णाला घेऊन जातो. कर्ण कोण आहे हे त्याला सांगून तू पांडवांचा जेष्ठ भाऊ या नात्याने पांडवाकडे ये, म्हणजे युद्ध होणार नाही असे सांगतो. कौरवांच्या अन्यायी पक्षाला साथ देऊन पूर्ण आर्यावर्ताला युद्धाच्या खाईत लोटण्यासाठी, खोट्या आदर्शाना स्वतः जळून इतरांना दग्ध करण्यासाठी, तेजाचा पुत्र असून अंधारात अंत पावण्यासाठी नकार देऊ नये असे श्रीकृष्णाला वाटत होते पण व्यर्थ. धुळीत पडला तरी हिरा काही काळ्या अंधाराची किरणं परिवर्तित करत नाही याची कर्णाला खात्री असते.
जेव्हा कुंती कर्णाला भेटण्यासाठी येते आणि त्याला सोबत येण्यासाठी म्हणते, तेव्हाही तो त्याच मतावर ठाम राहतो. शेवटी कुंती त्याला म्हणते की माझ्या पाच पुत्रांना अभय दे ! कर्ण म्हणतो की, "मी युद्धात अर्जुनाशिवाय कुणालाच वधनार नाही. अर्जुन मारला गेला तर मला धरून तुझे पाच पुत्र राहतील आणि मी मारला गेलो तर तुझे पाच पुत्र तसेच सुरक्षित राहतील. हे अभय नाही, दान नाही, वचन आहे." विश्वाच्या या अफाट पसाऱ्यात कोण कुणाला आणि कसलं दान करू शकणार ?
युद्धात श्रीकृष्ण कौरवांच्या बाजूने असावाच अशी कर्णाची इच्छा असते. त्यासाठी तो दुर्योधनाला मथुरेस पाठवतो. पण त्याचा राजकीय धुर्तपणा ओळखून श्रीकृष्ण दुर्योधनाला मोहवीत करणारा प्रश्न करतो. "एकीकडे निःशस्त्र मी आणि दुसरीकडे सशस्त्र अशी बलदंड सैनिक योद्धयांची सात अक्षौहिनी सेना यापैकी काय पाहिजे तुला ?" कर्णाच्या सर्व सूचना दूर करून शेवटी दुर्योधन यादवसेना स्वीकारतो. पुढे जाऊन सेनापती पदासाठी कर्ण स्वतः भीष्म पितामह यांना सेनापती करण्याचा आग्रह करतो. कर्ण हा जेष्ठ पांडुपुत्र आहे हे भीष्मांना माहीत असल्यामुळे त्याने युद्धात भाग घेऊ नये म्हणून तो दिग्विजयी योद्धा असूनही त्याला अर्धरथी म्हणून सर्वात शेवटचे स्थान देतात. कर्णाला ती गोष्ट खटकते आणि जोपर्यंत भीष्म पितामह रणांगणावर आहेत तोपर्यंत मी युद्धात भाग घेणार नाही असे सांगून युध्दाबाहेर राहतो.
युद्ध सुरू होऊन नऊ दिवस झाले होते. प्रेतांचे ढिगारे हिमालयाची उंची मोजू लागले होते. बऱ्याच सैन्य रचना आखून हाणून पडल्या होत्या. युद्ध सुरू झाल्यापासून दहाव्या दिवशी पितामह भीष्म पडतात. इच्छामरण असलेल्या भीष्मांना, शिखंडीला पुढं घालून अर्जुन बाण शय्येवर पाडतो. कर्ण त्यांना भेटण्यासाठी जातो. पितामह त्याला त्याच्या जीवनाचे सत्य सांगून पांडवांकडे जाण्यास सांगतात. " माझ्या मृत्यूबरोबरच हा वैरत्वाचा विनाशी वणवा विझू दे ! तू गेलास की दुर्योधन प्रत्यंचा तुटलेल्या धनुष्यासारखा निष्प्रभ होईल. लक्ष लक्ष योध्यांचे अकारण प्राण वेचणारं हे महायुद्ध इथेच थांबेल." पण कर्ण त्यांना म्हणतो, "माझा मार्ग चुकला आहे, आता तो तसाच चालत जाणं याशिवाय माझ्या हाती काही नाही."
कर्णाने श्रीकृष्णाला नकार दिला, राजमातेला परत पाठवलं, पितामहांची अंतिम इच्छा दूर सारून तो रणांगणात उतरतो. पितामह बाजूला झाल्यावर युद्धात नियम वैगरे काही राहत नाहीत. दिवस रात्र फक्त संग्राम. चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूवर कर्णासहित सहा महारथी एकाच वेळी चालून जातात. त्यात जयद्रताच्या कौर्याचा वृत्तांत अर्जुनाला कळताच, तो त्याला सूर्यास्तापूर्वी मारण्याची नाहीतर स्वतः अग्निप्रवेश करण्याची प्रतिज्ञा करतो. खग्रास सुर्यग्रहनाच्या साहाय्याने अर्जुन त्याला कंठस्नान घालतो.
घटोत्कच कौरव सेनेत हाहाकार माजवतो. चिंताक्रांत दुर्योधनाच्या सांगण्यावरून कर्णाजवळ असलेले एकमेव वैजयंती अस्त्र भीमपुत्र घटोत्कचावर चालवून त्याचा वध करतो. आणि कर्णाचं जीवन अक्षरशः रित्या भात्यासारखं होतं.
अफाट सेनेतील गर्जनारं युद्ध म्हणजे गुरू द्रोण. अश्वत्थामा नावाचा हत्ती पडल्यावर, फक्त अश्वस्थामा पडला याची युधिष्ठिर ग्वाही देतो. आणि पुत्रवियोगाच्या दुःखाने ध्यान धरलेल्या गुरू द्रोण यांचे मस्तक धृष्टद्युम्न धडावेगळे करतो. कौरावांचे सेनापती गुरू द्रोण आता राहिले नसताना, युद्धाच्या सोळाव्या दिवशी दुर्योधन कर्णाला सेनापती करतो. घनघोर युद्ध चालते. भीम प्रतिज्ञेप्रमाणे पांचालीच्या पवित्र प्रावरणाला स्पर्श करणारा हात उखडून टाकतो आणि दुःशासनासा वध करतो.
भीम, कर्ण, अर्जुन या तिघांनीच लाखो योद्धे यमसदनाला धाडले होते. कर्ण सर्वांना नमवून शेवटी अर्जुना समोर जातो. पुढे चिखलाची दलदल पाहता कुशल शल्य जो कर्णाचा त्या वेळी सारथी होता तो म्हणतो की, "राधेया, आजचा दिवस अर्जुनाशी युद्ध करण्यासारखा नाही ! या दलदलीत रथ घालण्यात धोका आहे. पण कर्ण त्याचे ऐकत नाही. कर्ण आणि अर्जुनाचा सर्वसंहाराक संग्राम चालू होतो. त्या संग्रामात दोन्ही सेना ग्रीष्मात विताळणाऱ्या हिमालयासारख्या क्षीण होऊ लागतात. सोळा दिवसात झालेल्या युध्दापेक्षा त्यांचं एक दिवसाच युद्ध कुरुक्षेत्रालाही पाहवत नव्हतं. ते धर्मक्षेत्रही भेदरलं होतं.
तोच पुढे येऊ पाहनाच्या कर्णाच्या रथाचे डावे चक्र जमिनीत रुतून बसतं. मावळतीस क्षितिजाजवळ जाणाऱ्या सुर्यासारखा कर्ण त्या रथाचे चक्र बाहेर काढण्यासाठी खाली उतरतो. त्याला निःशस्त्र पाहून त्यावर शस्त्रफेक कशी करायची म्हणून अर्जुन आपलं गांडीव धनुष्य खाली घेतो. पण श्रीकृष्ण अर्जुनाला त्यावर अर्धचंद्राकृती अंजलीक बाण मारण्यास सांगतो. जेव्हा अर्जुन बाण मारण्यासाठी धनुष्य उचलतो तेव्हा कर्ण त्याला म्हणतो, " निःशस्त्र पदस्थावर शस्त्र फेकण हा युद्धधर्म नाही." तेव्हा कृष्ण म्हणतो " धर्म ! राधेया, धर्माचा अर्थ तुला माहीत तरी आहे काय ? सुतपुत्रा, कुरुंच्या प्राचीन सभागृहात पांचालीला वारांगना म्हणताना तुझा हा दिव्यधर्म कुठे गेला होता ? पाचही पुत्रांसह वनात अनवाणी जाणाऱ्या कुंतीदेवीला पाहताना तुझा धर्म कुठं लपला होता ? लाक्षागृहात पांडवांची राख झाली ही वार्ता ऐकताना तुझा धर्म आक्रोशला नाही ? सोळा वर्षाच्या कोवळ्या अभिमन्यूला तुम्ही सहजणांनी घेतलात तेव्हा तुला तुझा आठवणारा धर्म का आठवला नाही ? अर्जुना, वेध साध "
आणि अर्जुनाच्या धनुष्यातून झंकारात निघालेला सुसाट अंजलीक बाण त्याच्या भरगच्च कंठाचा भेद करून त्याच्या कंठात रुतून बसतो. त्या शेवटच्या क्षणी मरणाआधी सुद्धा तो एक वृद्ध याचकला, त्याच्याजवळ काही नसल्याने त्यावेळी आपले सोन्याचे दात पाडून चित्रसेनाला देण्यास सांगतो. मरणाच्या दारातील ते त्याचं शेवटचं दान ठरतं.
#कुरुक्षेत्र #धर्मयुद्ध
कुरुक्षेत्रावरच्या महासंग्रामात असंख्य जीवांच्या जीवनाचं द्यूत खेळलं गेलं. तो एक जीवनयज्ञच होता. त्या कुरुक्षेत्रावरच्या मातीत काय काय म्हणून निर्माण होऊन वाढलं नाही ? दुर्योधनाची राजनीती, अश्वत्थाम्याच्या आत्म्याचं सखोल तत्वज्ञान, शकुनी मामाचं कपट, दुःशासनाचा अविचार, भीष्म पितामहांची विवश तटस्थता, गुरू द्रोणांची सामाजिक आदर्शाची भ्रांत कल्पना, महाराज धृतराष्ट्राच्या अंध डोळ्यांआड लपलेला डोळस स्वार्थ, विदुरांचा अयशस्वी संन्यास, कर्णाचा जीवनभराचा संभ्रम, पांडवांच कर्णाविषयी अज्ञान, राजमाता कुंतीचं हृदय पिळवटनारं दुःख, गांधारीने ठरवून मिटलेले नेत्र, कुरुंच्या आणि पांडवांच्या सेनांतून शस्त्र हाती घेऊन उभ्या ठाकलेल्या प्रत्येक सैनिकाची असीम राजनिष्ठा, मित्रनिष्ठा वा तत्वनिष्ठा, श्रीकृष्णातून प्रकट पावलेलं अद्वितीय क्षात्रतेज हे सर्व त्या मातीतूनच वाढलं होतं.
कर्णाचा पराक्रम मोठा होता, त्याग मोठा होता, त्याची लोकप्रियता मोठी होती आणि या सर्वांहून त्याची सुर्याराधना मोठी होती. पण, पण पांचालीच्या धवल पवित्र्यावर त्यानं भरसभेत उडविलेल्या राळीत ते सर्व माखून गेलं होतं. दुर्योधनामुळे नव्हे तर पांचालीमुळेच कर्णाचं जीवन खऱ्या अर्थानं अनुकंपनिय झालं होतं. मानवतेचा अपमान एक वेळ क्षम्य ठरू शकतो पण ज्या स्त्रीच्या कुशीतून मानवता जन्म घेते त्या स्त्रीत्वाचा एवढा निर्घृण अवमान कधीच क्षम्य नसतो. ज्या समाजात आणि राष्ट्रात स्त्रीत्व लज्जित होतं तो समाज आणि ते राष्ट्र विनाशाच्या खोल गर्तेच्या काठावर आपसूक जाऊ शकतं. भरसभेत पांचालीची विटंबना करून ओढवून घेतलेलं पाप हे क्षम्य नव्हतंच.
हे धर्मयुद्ध होतं अखिल मानवजातीसाठी, शरीरा शरीरांचे विविधढंगी आणि अगणित कुंभ धारण करून राहणाऱ्या अमर आत्मतत्वासाठी.
©____नित

Comments

Popular posts from this blog

हसरे_दुःख (भा. द. खेर) charlie chaplin hasare dukha

हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात Himalayatil mahatmyanchya sahavasat स्वामी राम

शकुंतला shakuntala