चिखल घाम आणि अश्रु बेअर ग्रिल्स chikhal gham aani ashru bear grils

#चिखल_घाम_आणि_अश्रू
ब्रिटिश गिर्यारोहक बेअर ग्रील्स याचं हे आत्मकथन.
त्याची टेलिव्हिजनवर सर्वाधिक पाहण्यात आलेली मालिका असेल, ती मला वाटतं "मॅन वर्सेस वाईल्ड". काही जणांचं म्हणणं आहे की त्याच्या दिमतीला एक प्रशिक्षित टीम असते. कॅमेरा टीम असते. असेलही... पण म्हणून त्याचे तिथवर पोहोचेपर्यंत केलेले धाडस, जिद्द, चिकाटी कमी आखता येणार नाही. या प्रकाशझोतात येण्यापूर्वीची त्याची पार्श्वभूमी जाणून घेतली पाहिजे.
बेअर ग्रील्स हे धाडसाचं नाव आहे. जिद्द ही त्याच्या नसानसात भिनलेली आहे. त्याच्या मते आयुष्यात बहुतेकदा धाडस हे नकळत सुरू होतं. आणि कदाचित तिथूनच आयुष्याला खरी सुरवात होते. वयक्तिक प्रगतीसाठी अतोनात कष्ट आणि पाठपुरावा करणं हीच त्याच्यासाठी यशाची खरी गुरुकिल्ली होती. युके स्पेशल फोर्स चा तो माजी सैनिक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली जगातील अवघड, कठीण आणि अशक्यप्राय अश्या मोहिमांचे विक्रम मोडले गेलेत. त्या मोहिमांचे नेतृत्व करून 1.5 दशलक्ष पौंडापेक्षा जास्त रक्कम त्याने "बाल कल्याण निधी"ला मिळवून दिलेली आहे. तसेच 2009 मध्ये "सर्वात तरुण स्काऊट प्रमुख" म्हणून स्काऊटिंग असोसिएशनची सूत्र त्याने स्वीकारली होती. पृथ्वीवरील जवळजवळ 28 दशलक्ष स्काऊटचा तो नेता होता.
इंग्लंड मधील वीट या बेटावर तो लहानाचा मोठा झाला. त्याच्या वडिलानी त्याला लहानपणापासून नौकानायनाचे आणि गिर्यारोहणाचे धडे दिले. लहानपणापासूनच तो पर्वतप्रेमामुळे बऱ्याच गोष्टी शिकला. जसे एखादी गोष्ट वेळेवर केली तर पुढच्या अनेक गोष्टी वाचतात. पर्वत सर्वांना समान पातळीवर आणतात. पर्वतावर श्रेष्ठ-कानिष्ठ असे विचार गळून पडतात. पर्वतामुळे आणि निसर्गामुळे माणसा-माणसात अतूट असे बंध निर्माण होतात. दररोजच्या आयुष्यात जे नातेसंबंध अनुभवायला मिळतात त्यापेक्षा अत्यंत वेगळे असे नाते संबंध पर्वतांच्या अनुभवानं जुळून येतात. गिर्यारोहणात तुम्हाला स्वतःला झोकून द्यावं लागतं. पर्वत तुम्हाला प्रयत्न करायला लावतात, लढायला उद्युक्त करतात. पर्वत मन मोकळं करायला शिकवतात. आणि बरंच काही... सारंच लिहीत नाही.
त्याच्या शालेय जीवनातच त्याने पहिली गिर्यारोहण मोहीम केली होती. वेल्स मधील सर्वात उंच शिखर "माउंट स्नोडॉन" आणि ती ही हिवाळ्यात. तरुण वयातच गिर्यारोहण आणि मार्शल आर्ट यातून त्याची स्वतःची ओळख झाली. ग्रॅंड मास्टरच्या प्रशिक्षण शिबिरासाठी तो जपानला गेला. तिथेही आपल्या चिकाटीने त्याने "ब्लॅक बेल्ट" मिळवला. घरी परत आल्यावर त्याने अत्यंत कष्टप्रद अशा "ब्रिटिश स्पेशल फोर्सेस" चा निवड अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आणि तो 21 SAS मध्ये दाखल झाला. या निवड प्रक्रियेदरम्यान त्यानं शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याची, चिकाटी आणि सहन शक्तीची परिसीमा गाठली होती. या सर्व ट्रेनिंगचे विस्तृत वर्णन, अनुभव या पुस्तकात त्याने मांडले आहेत. ते वाचताना आपल्याला त्याच्या कष्टाची, स्थेर्याची कल्पना येते. त्याच्यासाठी आयुष्य म्हणजेच प्रवास होता. आयुष्यात सर्वात एक गोष्ट महत्वाची असते. ती म्हणजे, स्वप्नांचा पाठलाग करणं, मात्र असा पाठलाग करताना मित्रांची आणि कुटुंबाची काळजी घेणं. हे तो जाणून असे.
1996 च्या उन्हाळ्यात तो दक्षिण आफ्रिकेतील "गेम फार्म" वर मदतनीस म्हणून काम करत होता. तिथे मजा म्हणून मित्रांबरोबर स्काय डायव्हिंग करायचा छंद त्याने जोपासला होता. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. 16000 फुटावरून खाली येताना पॅराशूटच्या कॅनॉपिला एक मोठं भोक पडून कॅनॉपि फाटली आणि हा अलगद येऊन खाली जमिनीवर पडला, चिंध्यांच्या बहुलीसारखा उडाला. त्यात त्याची पाठ तीन ठिकाणी मोडली. पण अश्या जीवघेण्या अपघातातून तो पुढे चालू शकेल की नाही अशी शंका वाटत असतानाच, डॉक्टरांचे सर्व अंदाज चुकवत वयाच्या केवल तेविसाव्या वर्षी तो एव्हरेस्ट सर करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक ठरला.
एव्हरेस्ट मोहिमेचे अनुभव आणि तो प्रवास वाचतांना खरोखरच प्रश्न पडतो... की या मोहिमेचा शेवटचा 4000 फुटाचा टप्पा म्हणजे मृत्युचा सापळाच आहे. कित्येक अनुभवी आणि तरबेज गिर्यारोहकांनी इथे प्राण गमावले आहेत. प्राणही गमवावा एव्हढं महत्व एव्हरेस्टला का आहे ? पण त्याचं उत्तर बेअर कडे नाही. कदाचित कुणाकडेही नसावं. इथे फक्त त्या विधात्याची आणि पृथ्वीवरील सर्वात उंच असणाऱ्या शिखराचीच मर्जी चालते. त्यांना तुम्ही आव्हान देऊ शकत नाही. स्वतःबद्दल म्हणायचं झालं तर इथे फक्त तुम्हीच तुमचे कर्ता असता. कसलंही ढोंग चालत नाही. कसलंही सोंग चालत नाही. दुसरा कोणताच पर्याय नाही. मृत्यूच्या डोळ्यात पाहायचं, भीतीची भावना स्वीकारायची, ईश्वराचा हात धरायचा आणि वर चढत जयायचं.
26 मे 1998 सकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्यावर बेअर म्हणतो... दोन्ही टोकांना क्षितिज वाकल्यासारखं दिसत होतं. हा पृथ्वीचा वक्राकार होता. "तंत्रज्ञान माणसाला चंद्रावर नेऊ शकेल, पण एव्हरेस्टवर नाही."
आणि त्याच्या सोबत असलेला निल म्हणतो "इथे पृथ्वी म्हणजे जमीन संपली आहे."
किती सूचक आहेत ही दोन्ही वाक्य..!!
अश्या जीवघेण्या धाडसी घटनांची मालिका असलेलं हे पुस्तक आहे.
©___नित
पुस्तक : चिखल घाम आणि अश्रू
लेखक : बेअर ग्रील्स
अनुवाद : अनिल / मीना किणीकर
मनोविकास प्रकाशन

Comments

Popular posts from this blog

हसरे_दुःख (भा. द. खेर) charlie chaplin hasare dukha

हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात Himalayatil mahatmyanchya sahavasat स्वामी राम

शकुंतला shakuntala