महाप्रस्थान भास्कर जाधव Mahaprasthan

#महाप्रस्थान
#युगंधर ही कादंबरी वाचून झाली होती. आणि भास्कर जाधव यांनी लिहलेल्या महाप्रस्थान या कादंबरी विषयी कळलं... काही दिवसांपूर्वी ती कादंबरी हातात पडली आणि वाचायला सुरुवात केली...तब्बल ६४० पानांची ही कादंबरी... पण यात संदर्भांचा उल्लेख नाही... भास्कर जाधवांची लेखनशैली आपल्याला खिळवून ठेवते. एक दोन विषय असे की थोडे मन बाजूला जाण्यास वाव आहे. पण एकंदरीत बाकी वाचनीय आहे कादंबरी. कादंबरीबद्दल त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर... महाभारतीय युद्धाच्या पहिल्या दिवसापासून, पांडवांच्या महाप्रस्थानापर्यंतचा कालखंड या कादंबरीत शब्दबद्ध केला आहे... या कालखंडातील धग, दाह, वेदना, संवेदना, दुःख, श्वास, निश्वास, उसासे-हुंदके, अश्रूपात तसेच शोध-प्रतिशोध, संघर्ष व अट्टाहास, यश-अपयश हे मानवी भावभावनांच प्रतिनिधित्व करणारं सारं त्यात आहे. जे उत्तम शब्दात उभं केलंय.

महाप्रस्थान या कादंबरीत बोलणाऱ्या व्यक्तिरेखा चारच आहेत. त्यात अनुक्रमे दिव्यदृष्टी लाभलेला संजय, दासीपुत्र विदुर, भगवान श्रीकृष्ण, आणि समय म्हणजेच काळ...

#संजय
महाभारतीय युद्धात सुरवातीपासून अंतापर्यंत, महर्षी व्यासांनी दिलेल्या दिव्यदृष्टीने कुरुक्षेत्रावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं धुतराष्ट्रासाठी वार्तांकन करणारं अवध्य व्यक्तिमत्व. खरंतर या युद्धातील सर्वच घटनांचा एकमेव कुणी साक्षीदार असेल तर तो आहे संजय. असंख्य सैन्यांची झालेली वाताहत, रक्तचिखलाने माखलेले रणांगण, शाप-प्रतिज्ञा यातून तुडवलेले नियम, प्रतिज्ञेसाठी अधर्माची धरलेली कास, अंध डोळ्यांतून आपल्या सुयोदनाच्या विजयाचे स्वप्न पहाणारा बाप, दिवसागणिक एकेक वार्तांकन करत असतांना त्याच्या पिळवटून जाणाऱ्या हृदयाची हतबलता, त्यातून उत्पन्न होणारा आक्रोश-संताप काय म्हणून त्यास पाहावं लागलं नाही! महर्षी व्यासांचं दिव्यदृष्टीचे वरदान हे एकप्रकारे त्याच्यासाठी शापच होता. तदनंतर धुतराष्ट्र, गांधारी आणि कुंती जेव्हा वानप्रस्थाश्रमात जाण्यासाठी निघतात तेव्हा तो त्यांची सोबत करतो. पुढे गंगोत्रीला पोहचून त्या चारही जणांचा मृत्यू होतो. तो प्रवास त्याच्या दृष्टीने लेखकाने शब्दबद्ध केला आहे.

* संजयच्या दृष्टीतून भीष्मांबद्दल जो प्रसंग शब्दबद्ध केला आहे तो थोडासा संभ्रमित करणारा आहे... तो असा की भीष्म कृष्णाला सांगतो की, तू उद्या शिखंडीच्या आडून अर्जुनाला माझ्यावर हल्ला करायला सांग... तसं पाहता महाभारत आणि युगंधर मध्ये असं नाहीये. 

#विदुर
धुतराष्ट्र, पांडू आणि विदुर या तिघांचेही वडील एकच, महर्षी व्यास... पण तिघांच्या आई मात्र वेगवेगळ्या... अंबिका, अंबालिका आणि एक दासी. जो सर्व वासनेपासून दूर तो "विदुर". एक दासीपुत्र. आपल्या नावाप्रमाणेच तो हयातभर वागला. वास्तविक पाहता त्यालाही त्या राज सिंहासनावर बसण्याचा अधिकार होता. पण केवळ दासीपुत्र म्हणून त्याला दूर ठेवलं गेलं. ही सल कायम त्याच्या मनात राहिली. पुढे युद्धानंतर 101 वा कौरव युयुत्सु जो मधेच पांडवांच्या बाजूने जाऊन युद्ध लढला होता, त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी विदुरावर येते. कारण त्याच्या डोक्यावर परिणाम झलेला असतो. आणि (युयुत्सु हा ही एक दासीपुत्रच, त्याचे वडील महाराज धुतराष्ट्र) त्याच्या मृत्यूनंतर(?) विदुर नियतीने दाखवलेला मोक्षाचा मार्ग स्वीकारतो. युद्धानंतर गांधारीने श्रीकृष्णाला दिलेला शाप, धुतराष्ट्राने दुर्योधनाच्या हत्येचा भिमाशी घेतलेला प्रतिशोध, सुतकी वातावरणात झालेला युधिष्ठिराचा राज्याभिषेक हे प्रसंग मनाला चटका लावून जाणारे.

* लेखकाने इथे जो धुतराष्ट्र आणि भीमाचा प्रसंग उभा केलाय त्यात त्यांनी "यांत्रिकपणे भिमाची हालचाल करणारी प्रतिकृती" असा भीमाचा उल्लेख केला आहे. आणि विशेष म्हणजे त्यानी आधी विदुराच्या पायावर वाकून नमस्कार केला होता. तो प्रसंग पूर्ण झाल्यानंतर डोळस असलेला विदुरही आश्चर्यचकित होतो. आता त्या काळात अशी तंतोतंत दिसणारी यांत्रिक प्रतिकृती निर्माण होत होती ? हा माझ्यासाठी मुळातच प्रश्न आहे.

#कृष्ण
श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा जीवनपट त्याच्याच शब्दांतून त्यांनी शब्दबद्ध केलाय... त्यात गोकुळातील बाललीला, श्रीकृष्णाला कुठेतरी अंतर्मुख होऊन विचार कारायला लावणारं राधेचं प्रेम, गोकुळ सोडताना तो पुन्हा माघारी येणार नसल्याचे तिला ठाऊक असतानाही आयुष्याच्या अंतापर्यंत वाट पाहणारी राधा. जिच्या स्वाभिमानाला अहंकाराचा दर्प होता अशा द्रौपदीची विटंबना झाल्यानंतर ती अखिल स्रीजातीची विटंबना आहे म्हणून, आणि सत्य खाली पडून अधर्म मातून जाऊ नये म्हणून कुरुक्षेत्रावर घडलेले महाभारतीय युद्ध. त्या युद्धात अर्जुनाला समोर ठेऊन अखिल मानवजातीला सांगितलेले गिताज्ञान. पांडवांचा विजय झाल्यानंतर गंधारीच्या शापाने छत्तीस वर्षात अधःपतनाला पोहचून द्वारकेचा झालेला विनाश. 

*आपल्याच हातानी तृणभाले, (लव्हाळी, मुसळ) मद्यधुंद होऊन एकमेकांवर तुटून पडलेल्या यादवांवर ते गतप्राण होईपर्यंत फेकत राहिलेला कृष्ण. "तुझ्या कान्हानं जीवनयात्रा संपवली. त्याचं निर्वाण झालं" हा संदेश गोकुळी जाऊन राधेला सांग असं हळवेपणान उद्धवाला सांगणारा कृष्ण. प्रयोपवेशन घेऊन बलराम देह त्यागून गेल्यावर एकाकी महाप्रस्थानाला निघालेला कृष्ण. वस्तुतः मृत्यूच्या शोधात अरण्यात जाऊन एका अश्वत्थ वृक्षाखाली, गांधारीच्या शापाप्रमाणे कुणी एका व्याधाच्या धनुष्यातून येणाऱ्या बाणाच्या प्रतीक्षेत एकाकी असलेला कृष्ण... यात शब्दबद्ध केला आहे. एकूणच मानव योनीतुन जन्म घेतलेल्या देवालाही नियतीने दिलेले प्रारब्ध भोगावेच लागते.

#समय(काळ)
वेळेपेक्षा श्रेष्ठ भाष्यकार कुणी नाही, आणि म्हणूनच लेखकाने कादंबरीचा शेवट काळाच्या शब्दांतून केला आहे. ज्या काळाला कारागृहात जन्मलेला बाळ श्रीकृष्ण, गोकुळात वावरणारा, कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगणारा आणि गांधारीच्या शापाने दग्ध होऊन मृत्यूची प्रतीक्षा करीत, अरण्यात एक वृक्षाखाली पहुडलेला कृष्णही परिचयाचा आहे. जरा नामक पारध्याकडून श्रीकृष्णाचा झालेला मृत्यू, गोकुळात उध्दवाने ते राधेला सांगितल्यावर दोघांत झालेल्या तात्विक हळव्या संवादानंतर तिनेही केलेला देहत्याग, उद्धवाचे महाप्रस्थान, अर्जुनाचा अभिरांच्या हातून झालेला पराभव, माघारी आलेल्या युयुत्सुला परीक्षिताच्या नावे हस्तिनापूरचा राज्यकारभार चालवायला सांगून पाचही जण महाप्रस्थानासाठी निघून जातात. त्या वाटेवर मागे राहिलेल्या द्रौपदीला अश्वत्थामा भेटतो, त्या दोघांतील भावनिक हळवा संवाद, जिच्या पुत्रांची ज्याने हत्या केली त्याचं दुःख सावरण्याचा तिचा निष्फळ प्रयत्न... असे अनेक प्रसंग अगदी जिवंत केले आहेत. पुढे जाऊन पहिला देह सोडला तो द्रौपदीने त्यानंतर अनुक्रमे सहदेव, नकुल, अर्जुन, भीमाने सोडला. युधिष्ठिर आणि त्याच्या सोबत असलेला श्वान मात्र दूर दूर अंधार पडणाऱ्या क्षितिजाकडे निघून जातात.... 

महाभारताचा आशय असलेली ही कादंबरी भावस्पर्शी, अर्थपूर्ण आणि भाषाशैली तेवढीच उत्तम आहे.

शुभंकर पब्लिकेशन  कोल्हापूर
©___ नितेश पाटील नित

Comments

Popular posts from this blog

हसरे_दुःख (भा. द. खेर) charlie chaplin hasare dukha

हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात Himalayatil mahatmyanchya sahavasat स्वामी राम

शकुंतला shakuntala