मूलभूत_गरजा
आग कितीही जोरात भडकली, वारा कितीही सुसाट सुटला, पाऊस कितीही जोराचा पडला, तरी प्रकृतीच्या नियमाप्रमाणे ते कुठेतरी येऊन थांबतं. पण ते अश्या परिस्तिथीत जितका वेळ या भूतलावर थांबतील, तितकी जास्त फरफट या पृथ्वीतलावर असणाऱ्या, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या जीवांची होत असते.
रोज चुलीत अन्न शिजवण्यासाठी आगीची गरज पडते म्हणून कोणी आगीचा भडकलेला भडका घरात घेऊन येत नाही. घरातील गरम वातावरण थंड करण्यासाठी वारा लागतो म्हणून कुणी वादळ घरात घेऊन येत नाही. घरात रोजच्या व्यवहारात पाणी लागतं म्हणून जोराचा पाऊस चालू असतांना कुणी घराचं छप्पर काढून टाकत नाही.
प्रत्येक जीवास त्याच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षातून सुख या संकल्पनेला साध्य करण्यासाठी झटत असतांना नेमकं सुख कशात आहे याचा जीवांना विसर पडतो. आणि परिणामी माणूस दुःखाच्या कचाट्यात सापडतो. ते दुःख दूर करण्याचे अमिष दाखवणाऱ्या काही वाईट प्रवृत्तीना तो बळी पडतो. निच्छितच त्याचे ज्ञान येथे कमी पडते. आणि आपापसात तो भांडू लागतो. जेथे मोह बलवान होतो तेथे समाधान आपसूकच पुसट जातो.
परिणामी त्याच्या झोळीत दुःख, मनःस्ताप, वैर यावाचून दुसरे काहीच शिल्लक राहत नाही. या भूतलावर प्रत्येकाला आपले प्रारब्ध हे भोगावेच लागते, त्यातून त्याची सुटका नाही. आंब्याच्या झाडाला सफरचंद कधी येऊ शकत नाहीत, आणि प्रत्येक आंब्याच्या झाडाला फळ येईलच असे नसते, आलेच तरी त्याचा आकार, त्याची चव, त्याचा रंग सारेच वेगळे... त्यात एकच गोष्ट समान असते ती म्हणजे त्याला लागणाऱ्या त्याच्या मूलभूत गरजा...
____नित
Comments
Post a Comment