हिंदू (भालचंद्र नेमाडे) hindu

२०१४ या वर्षी ज्ञानपिठ पुरस्काराने सन्मानित झालेलं हे मराठीतील चौथं साहित्य. तत्पूर्वी १९७४साली ययाती (वि. स. खांडेकर), १९८७ साली विशाखा कवितासंग्रह (कुसुमाग्रज), २०१३ साली अष्टदर्शने(वि.द. करंदीकर) हे साहित्य या पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.
____हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ (अडगळ हा शब्द खटकला पण...) कशी असू शकते हे या कादंबरीत उलगडत जाते. खंडेराव स्वतःशीच संवाद साधून झोपी जातो. स्वतःशीच बोलू लागतो. आणि त्याला पुन्हा दिसू लागतात, त्यांनी संशोधित केलेल्या खाणाखुणा. व्यासपीठावर पुरातत्वज्ञ मिस्टर म्हणून अध्यक्ष त्यांची ओळख करून देतात. आणि त्यांचा शोधनिबंधाची माहिती उपस्थितांना करून देण्यास सांगतात. तदनंतर शहरी भाग आणि ग्रामीण भाग याच विश्लेषण त्यांनी केले आहे. खान्देशातील मोरगाव हे खंडेरावांचे गाव. त्यात त्यांचा लाहोर ते खान्देशातील मोरगावाचा प्रवास, पाकिस्तान ते भारत, आठवणींच्या वर्तमानात होणारे सारे बदल त्याचा जीवनावर होणारे परिणाम, समाजातील खाणाखुणा, जाती जमाती, शोषण, ऐतिहासिक, लोककथा यांचा जीवनावर होणारा परीणाम, साऱ्यांचा गुंता कसा प्रबळ होत जातो हे मुद्देसूद मांडले आहे.
___जगापासून दूर राहण्याची धडपड त्याला आणखीनच त्या जगात कशी गुंतवत नेते अशी काहीशी कादंबरी आहे. तसं या कादंबरीच आकलन ही सोपी गोष्ट नाहीच. मुळात नेमाडेंना समजणे तितके सोपे नाहीच. गाव विरुद्ध शहर, शेती विरुद्ध उद्योग ही कळकळ या कादंबरीतून जाणवते. गावाकडच्या शहरातील अनेक गोष्टी खंडेराव निर्धास्तपणे सांगत जातो. ते सांगत असताना शहरिपणाला बोचरणारे काही प्रसंग वाचनात येतात. जवळपास वीसेक वर्षाचा कालावधीतील चित्रण या कादंबरीत आहे. शिव्यांची काहीच कमी नाही. अस्सल शिव्या या कादंबरीत सर्रास आलेल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान फाळणीचा विषयही यात आलेला आहे. तिला जबाबदार कोण किव्हा त्यातून काय साध्य झाले हे या कादंबरीच्या सुरवातीस सांगण्याचा प्रयत्न असावा.
____सिंधू नदीच्या तीरावर कित्येक शतकांपूर्वी आर्यांचे आगमन झाले. आणि एक संस्कृती रुजली गेली. आणि भारतात ती अनेक वलयांनी बहरली. प्रत्येक समाजातील थोर महानुभावांनी विचारवंतांनी समाज्याच्या गरजांनुसार आपले अभ्यासू विचार मांडण्याचे कार्य अविरत केले व आजही तेच चालू आहे म्हणायला हरकत नाही. पण त्यामुळे होणारे समाजातील बदल सर्वांच्याच पचनी पडले नाहीत. म्हणूनच संस्कृती जरी टिकून राहिली तरी ती बहुरंगी विचारांच्या विळख्यात सापडली. आणि त्यातूनच समाज, कुटुंब, रूढी, परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा, शेती, व्यवसाय, नोकरी असे अनेक वेगवेगळे रकाने निर्माण झाले. आजही त्यामुळे समाजात चांगले वाईट परिणाम समोर येत असतात. आणि याच अडगळीतून हिंदू संस्कृती समृद्ध होत गेली. हे या कादंबरीतून आपल्याला सांगण्याचा नेमाडे यांचा प्रयत्न असावा.
____आजही समाजात आपण बघतोच अमुक एक विचारसरणी माझ्यावर आक्रमण करते. आणि मी तिच्या अधीन होऊन इतर उत्तोमत्तम असणारी विचारसरणीही मला फोल वाटून राहते. आणि एक संघर्ष उदयास येतो. चांगल्या विचारांनी चांगल्या विचारांशी केलेल्या द्वंदातून हानी चांगल्या विचारांशी होऊन वाईट प्रवृत्ती जन्म घेते. याला कारणीभूत असते माझी एकाच विचाराप्रति असलेली निष्ठा. निष्ठेची व्याख्या कळण्याइतपत आपलं ज्ञान का अपुरं पडावं हा मला भेडसावणारा प्रश्न आहे. मी ज्या विचारसरणीचा आदर्श माझ्यासमोर ठेवतो ती फक्त या समाजाचा एक भाग आहे. असे अगणित पैलू समाजात असतात. या अंतराळात पृथ्वीवरच जीवसृष्टी असली तरी सूर्य चंद्र तारे नक्षत्र ग्रह यांचे अस्तिव कसे नाकारता येईल. सर्वांची आपली एक वेगळी ओळख आणि वेगळे कार्य आहे. स्वार्थ हा शब्द त्यांच्या कोशातच नाही. ते अविरत युगानुयुगे स्वक्षेत राहून चालत आलेले आहेत. त्यांनी त्यांची बांधिलकी जपली आहे म्हणूनच ही जीवसृष्टी अस्तित्वात आहे. आणि इथे तर निष्ठा तिथे स्वार्थ हे समीकरण जोम धरू लागलंय. अपवाद आहेत तो भाग वेगळा. मी काही समीक्षक नाही पण माझ्या वाचनातून माझ्या अल्पबुद्धीला कळलेलं हे विवेचन तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून हा प्रपंच. वाचकाला ही कादंबरी अनेक अंगाने विचार करायला लावणारी निश्चितच आहे.
शेवटी भालचंद्र नेमाडेंच्याच ओळी देऊन संपवतो....
ह्या विश्वभानाच्या घोंघावत्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो
आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा, न ढळो
हे पहाटी पांघरलेले दाट झाडांतून डोकावणारे रोशन सूर्य
या खिन्न विनाशतत्त्वाच्या झपाट्यात दरवळो
अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ,
साचो घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ.
धन्यवाद
___नित नितेश पाटील


Comments

Popular posts from this blog

युगंधर शिवाजी सावंत yugandhar shivaji savant

हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात Himalayatil mahatmyanchya sahavasat स्वामी राम