हसरे_दुःख (भा. द. खेर) charlie chaplin hasare dukha



#हसरे_दुःख भा. द. खेर
दिसते बरेच काही, ओढ तुझीच मना रे
जाणून घ्यावे तुजला, दुःख होईल हासरे
____सकाळचे आठ वाजले आणि कुर्ला टर्मिनलहून, गुवाहाटी एक्सप्रेसने मी प्रवास चालू केला. आज गाडीतील मुसफिरांत, बाहेरच्या सृष्टी सौंदर्यात मला स्वारस्य नव्हतं. आज माझ्या हातात उशिराने का होईना, पण एक महान कलाकाराचा जीवनपट होता. गाडी आम्हाला घेऊन पुढे पळत असताना ती बरंच काही अगदी जवळून मागे सोडत होती. स्थित वृक्षवेली, आषाढात हिरवा शालू नेसलेली धरा मागे पळवत होती. तरी खिडकीतून दिसणाऱ्या त्या विहंगमय दृष्याकडे मी आज पाठ फिरवणार होतो.
जाणे कधी काय वाढे, नियती माझ्या पुढ्यात
तुम्हा हसरे पाहून, रमलो माझ्या दुःखात
____माझा पुढचा प्रवास गोरखा लँड स्ट्राईक ची झळ सोसत असलेल्या पश्चिम बंगाल, सिक्कीमच्या खडतर वाटांवरून होणार असला तरी आज जगविख्यात विनोदसम्राट "चार्ली चॅप्लिन" यांचा जीवन प्रवास, भा. द. खेर यांनी शब्दबद्ध केलेल्या "हसरे दुःख" या कादंबरीतून मी जाणणार होतो. भा.द.खेर यांच्या भाषेत म्हणायचं तर, आपल्या हसऱ्या मुखवट्यातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणाऱ्या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची ही कहाणी होती. आणि खरंच अगदी दोनच दिवसात मी ही कादंबरी झपाटल्यासारखी वाचून काढली.
कोणास हवे सांग ते, दुःख त्याच्या जीवनात
सांगून होते का कधी, दुःख नाहीसे क्षणात
____आज दुःख कुणाच्या आयुष्यात नसतं.!! आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते कुणास हवं असतं..!! पण नियतीने कोणाच्या पुढ्यात कसे आणि केव्हा दुःखाचे भोग वाटेत रचून ठेवलेत ते कुणालाच सांगता येणार नाही. अगदी मनुष्य योनीत जन्म घेणाऱ्या त्या विधात्यांसही ते चुकले नाहीत. आणि आपण तर केवळ सुखाच्या लालसेपोटी नाविन्यात रमणारी माणसं. आपल्या आयुष्यात नित आनंदाचे हसरे क्षण यावेत हीच अपेक्षा ठेऊन माणूस जगत असतो.
ठाऊक नाही तुजला, किती खोल दुःख माझे
वाट बोचरी तरीही, चालणे कर्तव्य माझे
____पण सतत दुःखाच्या बोचऱ्या वाटेवर अनिच्छेने चालून सुद्धा, तिच्या मन विषण्ण करणाऱ्या झळा सोसून सुद्धा सतत दुसऱ्यास हसरे क्षण त्याने देऊ केले. त्या अवलियाचे चरित्र वाचताना, कितीतरी वेळा गहिवरून आलं, डोळ्यांच्या कडा पाणावल्या. संघर्षातून तेजाकडे होत जाणारा हा प्रवास मनास चटका लावून गेला. दुःखाची खोली किती असू शकते हे त्या विधात्यासही ठाऊक असते की नाही याबद्दल मनात शंका आली. पण...
सोसत आले नित्याचे, दुःख खिळून राहिले
जाब कुणास विचारू, दैव माझेच रुसले
____त्या संघर्षमय परिस्तिथीत, शेवटपर्यंत त्याच ईश्वरावर विश्वास ठेवायला सांगणारी त्याची आई, रंगमंचावरील लिली हार्ले म्हणजेच हॅना चॅप्लिन... तिने दिलेले संस्कार... तिची सहनशीलता... तिची सहनशक्ती... तिचे कर्तृत्व... हे आकालनिय आहे. एकूणच तिचा पहिला संसार मोडला. तिच्या पदरात एक मुल घेऊन ती आफ्रिकेतून इंग्लंडला आली. दुसरा संसार थाटला. आणि चार्लीचा जन्म झाला. तदनंतर तोही संसार फार काळ टिकला नाही. तिला इथेही तलाक घ्यावा लागला. पदरात असलेल्या दोन मुलांना तिने आपल्या कलेच्या जोरावर जोपासायला सुरवात केली. पण नियतीने तिथेही घात केला. रंगमंचावरील साऱ्याच कलेत पारंगत असलेल्या लिलीचा आवाज रंगमंचावर कार्यक्रमा दरम्यान कंठातून चिरकला. आणि सुमधुर आवाजाने तिची साथ सोडली. स्वर आतल्या आत विरून गेले. काही केल्या कंठातून आवाज बाहेर आला नाही.
किती करावी शर्थ मी, पंख तुटले असता...
आकाश जरी मोकळे, माझ्या समोर आहे...
____ती वेळ पाच वर्षांच्या चार्लीने प्रथमतः स्टेजवर पदार्पण करून सावरुन नेली, परंतु आपल्या हुकमी कलेच्या जोरावर रंगमंच गाजवणारी लिली स्टेजवरून पायउतार झाली ती कायमची. आणि मागे उरली ती एक सर्वसामान्य स्त्री हॅना चॅप्लिन. तदनंतर जो त्यांच्या आयुष्याचा अति खडतर प्रवास चालू झाला तो अतिशय निर्दयी आणि केविलवाणा असा. वर्षे सरत गेली पण दारिद्र्य तिथेच रेंगाळत राहिले. रंगमंचावरून निघालेले पाय शिवनयंत्रावर कसू लागले. सप्तसुरांची धून शिवनयंत्राच्या कर्णकर्कश आवाजात विरून गेली. मोठा मुलगा सिडने ही हाती मिळेल ते काज करू लागला. पण नियतीला त्यांची अजूनतरी दया आली नाही. हातावरचं पोट उपाशी राहू लागलं. अश्या परिस्तिथीतही कोणासमोर हात मांडण्यास त्यांचा आईने दिलेले संस्कार आड येत होते. तिने मात्र सारा भार त्या विधात्यावर सोपवला होता. अशात चार्ली म्हणायचा, आई त्या विधात्याकडेच काही नसेल तर तो आपल्याला कुठून देणार ..!!
नसेल जवळ त्याच्या, मज काही देण्याजोगे...
देव जरी असला तो, देणार कोठून आहे..!!
____त्या दोन्हीही मुलांना आपल्या आईचे कष्ट, ती करत असलेली धडपड दिसत होती. ती नेहमीच चार्लीला म्हणायची, तू उद्या खूप मोठा होशील, खूप काम कर, कष्ट कर. तुला खूप यश मिळेल, पण यशाने हुरळून जाऊ नकोस. आणि काहीही झालं तरी त्या विधात्यास कधी विसरू नकोस. इतक्या हालअपेष्टा सहन करूनही त्या विधात्याप्रति असलेली तिची आस्था खूप मोठी होती. त्यांच्या अंधारलेल्या खोलीत ती जेव्हा दिवा लावत असे, तदनंतर तिची दिसणारी सावली पाहून चार्लीला आपल्या आईच अप्रुव वाटे.
विझू नये दिवा धरी, आई ओंजळीत त्याला...
दिसे छाया तिची मोठी, आहे तितका जिव्हाळा...
____मृगजळासारख्या सुखाची सतत आस धरायची आणि सोबत दुःखाची करायची. हे नित्याचेच झाले होते. परिस्तिथीने त्यांना वर्कहाऊसला आणून सोडले, आणि तिथेही नियतीने घाव घातला. तिघांनाही तेथे वियोग सहन करावा लागला. आईला वेडाचा झटका आला. पोरं पोरकी झाली. रंगमंचावर हुकूमत गाजवणाऱ्या लिलीच्या आयुष्यात दारिद्र्याचं नाटक संपायच नाव घेत नव्हतं. प्रेक्षकांच्या वाहवाहीची जागा दुःखाने घेतली होती. नेत्रांतून अश्रूंचा वर्षाव संपत नव्हता. पण अश्रू सांडले म्हणून माणसाचं दुःख कमी होत नसतं याची त्यांना जाणीव होती. तद्वतच कोर्टाचा निकाल आला. आणि त्या लावरीस मुलांची जबाबदारी कोर्टाने त्यांच्या वडिलांवर सोपवली. तिथेही त्यांना सावत्रपणाची झळ सोसावी लागली. आई वेडेपणातून सावरली आणि मुलांचा तिने ताबा घेतला. पण सोबत दारिद्र्यही होतंच. तिने पुन्हा शिवनयंत्रावर जोरात काम करायला सुरुवात केली. पण तिची प्रकृती पुन्हा खालावली. विधात्या...
देशील किती घाव तू, कधी संपेल नाटक
आयुष्याच्या पटावर, चाले तुझाच वचक
____अश्यातच तिच्या पतीचेही निधन झाले. आणि येणारी थोडीफार आवकही बंद झाली. सिडनेने बोटीवरील काम स्वीकारल्यामुळे तो आफ्रिकेच्या ट्रिप वर गेला. आणि या दोघांना पुन्हा आपले विंचवाचे बिर्हाड हलवावे लागले. भुकेने व्याकुळ त्यांनी कसेबसे दिवस काढले. पण कुणासमोर भीक मागितली नाही. आपला स्वाभिमान डळमळू दिला नाही. सिडने अजून परतला नव्हता. पुन्हा त्याच्या आईला वेडाचा झटका आला आणि तिला दवाखान्यात भरती केलं. चार्ली आता एकाकी अनाथ झाला होता. दुःखालाच दारुण दुःख यावं अशी केविलवाणी परिस्तिथी निर्माण झाली होती. दुःखालाच लाज वाटावी अशी त्या कुटुंबावर परिस्थिती ओढविली होती.
यावं दुःखालाच दुःखं , करुणेनी म्यान व्हावं
रित्या डोळ्यातून तरी, अजून काय पाहावं..!!
____सिडने परतण्याची तार चार्लीला मिळाली. फाटक्या कपड्यानी, झिझलेल्या बुटांनी गरिबीची लक्तरे घेऊन तो स्टेशनवर त्याला भेटण्यासाठी गेला. सिडनेला काही क्षण त्याला ओळखता आले नाही. दोघांच्या नेत्रांतून अश्रुंचे पाट वाहून गेले. जाऊन दवाखान्यात आईची भेट घेतली. आणि सिडनेने आता अभिनेता होण्याचे ठरवले होते. त्याची तशी कारकीर्द चालुही झाली. त्याने कॅम्बरवेल स्टुडिओत चार्लीबद्दल शब्द टाकला आणि त्यांनी त्याला भेटण्याची विनंती मान्य केली. ती बातमी ऐकताच चार्ली खूप खुश झाला. पण काळ अजून बाकी होता...
सारे सोसून संपले , किती हर्षित वाटणे
नियतीचे डाव न्यारे, आपण तिचे खेळणे
____आयुष्याची खडतर सतरा वर्षे दारिद्र्याच्या तीक्ष्ण झळा सोसून त्यांचं आयुष्य होरपळून निघालं होतं. त्यातही चार्लीने नृत्य, लिखाण, अभिनय असे गुण जोपासले होते. त्याचे आईवडील दोघेही उच्च प्रतीचे कलाकार असल्यामुळेच ते सर्व गुण त्याच्यात आपसूकच आले असावेत. आताशी त्यांच्या आयुष्याला एक सूर सापडला होता. सिडनेने जेव्हा ती बातमी चार्लीला सांगितली तेव्हा क्षणभर त्याला ते खरच वाटलं नाही. मनात दाटलेली दुःखाची गर्दी सुखाला आत सहजसहजी प्रवेश करू देत नाही. फ्रेड कार्नो जेव्हा पहिल्यांदा चार्लीला भेटले तेव्हा त्यांनाही हा विनोदी भूमिका करेल की नाही याबाबत शंका आली. दोन आठवड्याच्या चाचणी नंतर एक वर्षासाठी त्याला त्यांनी करारबद्ध करण्याचे आश्वासन दिले. पडदा दूर झाला. अंगावर फ्रॉककोट, डोक्यावर टॉपहॅट, आणि हातात एक काठी. त्याच्या पहिल्याच प्रयोगाला प्रेक्षकांनी उत्तम दाद दिली. सोबतच्या अनेक कलाकारांनी त्याची प्रशंसा केली.
जोपासले दुःखात मी, सुख देण्याचे तराने
आले आज बहरून, खरे जीवनाचे गाणे
____फ्रेड कार्नो कंपनीत चार्लीचा निर्विवाद प्रवेश झाला. पण आपल्यापेक्षा जर दुसरा माणूस पुढे जात असेल तर तो नकळत त्या माणसाचा द्वेष करू लागतो याची त्याला इथे प्रचिती आली. चार्लीचा स्वभाव मात्र वेगळाच होता. तो कधीच कुणाचा द्वेष करीत नव्हता, उलट त्याच्यामध्ये जे कमी आहे ते दुसर्याकडून शिकत होता. कुणाचा द्वेष न करता ज्यानं त्यानं आपापल्या वाटेला जावं हे बरं..! माणसाच्या आयुष्यात यशाअपयशाच्या लपांडवाचा खेळ चालूच असतो या मताचा तो होता. म्हणूनच त्याला यशाचं शिखर गाठता आलं. कामाचे प्रयोग करण्यासाठी अमेरिकेत गेला, आणि त्याला त्याची इतकी भुरळ पडली की याच भूमीत आपलं आयुष्य उज्वल करायचं. हा निर्धार त्याने केला.
माझे जीवनच मुळी, चढ उताराची वाट
भोळ्या शंकराच्या दारी, दऱ्या डोंगराचा घाट
_____मागे इंग्लंडच्या वाटेवर वळताना भविष्य सांगणाऱ्या वाटेवर त्याचे पाय वळले. चाळिशीतल्या जिप्सीबाईने वर्तमान तंतोतंत कथन करून त्याचे भविष्य सांगितले. आणि पुढेही अगदी त्याच पद्धतीने त्याच्या आयुष्याचे फासे नियतीने टाकले. कोण जाणे हा योगायोग होता की अजून काही..!! पुढचे त्याचे उज्वल भविष्य अमेरिकेतच घडले, मुकपट, बोलपटातही त्याने उत्तुंग शिखर गाठले ते आजही आपल्या समोर आहेच. परंतु त्याने अमेरिकेचे नागरिकत्व न स्वीकारल्यामुळे ते तेथील काहींना आवडले नाही. म्हणूनच काय की, त्याला शिखरावर चढलेले पाहून त्याला खूप त्रास दिला गेला. पुढील आयुष्य तिथे व्यतीत करणे सोयीचे नव्हते हे त्याच्या चाणाक्ष बुद्धीने हेरले. आणि एक योजना आखून सुखरूप आपल्या कुटुंबासह मायदेशी इंग्लडला परतला. कारण माणसाला मान मिळाला नाही तरी चालतो पण मानहानी नको असते.
दुःख दारिद्र्याचे ठायी, माझा भाबडा विचार
सुख दुःखाचे एकच, नाणे नियतीचा वार
_____जगाला आपल्या विनोद शैलीने मोहित करणाऱ्या अवलीयास मात्र आयुष्य भर घोर संघर्ष करावा लागला. पण त्याने परिस्तिथीचा सामना करण्यासाठी आपल्या आंतरमनातील आवाज नेहमीच ऐकला. आतून येणाऱ्या संदेशाप्रमाणे तो नेहमीच वागत गेला. अखेरीस काही काळ त्याचा समाधानात गेला तो मात्र मायदेशी इंग्लंडलाच. आज साऱ्या जगात तो विश्वविख्यात विनोदसाम्राट आहेच पण त्याने सोसलेल्या दुःखाची कल्पनाही आपण करू शकत नाही. कारण माणसाला दारिद्रय नाही असं नाही, पण दारिद्र्यातून सम्राट होणं आणि जगाच्या हृदयात आपलं स्थान निर्माण करणं, व ते आजही आणि यापुढेही टिकून राहणं ही सोपी गोष्ट नाही. या गोष्टीला निश्चितच एक कारण आहे आणि ते चार्लीच्याच भाषेत म्हणायचं तर... '' माझं आयुष्यच नाट्यमय आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सर्व वास्तव मी स्वतः अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दुःख दाखवून देतो.''
___नितेश पाटील (धनसार,पालघर)
९६३७१३८०३१


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हिंदू (भालचंद्र नेमाडे) hindu

युगंधर शिवाजी सावंत yugandhar shivaji savant

हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात Himalayatil mahatmyanchya sahavasat स्वामी राम