रांजण ( नम्रता माळी पाटील ) ranjan
माणसाच्या चेहऱ्यावरून ज्याप्रमाणे आपण एकंदरीत त्याच्या अंतरंगाचा अंदाज घेऊ शकतो. त्याचप्रमाणे पुस्तकांच्या अंतरंगाचा अंदाज त्याच्या मुखपूष्ठावरून आपण घेत असतो. हा आता ते त्या अंतरंगाला किती साजेसं आहे, हे ते पुस्तक वाचल्यावरच आपल्याला कळतं. पण "रांजण" या पुस्तकाचे मुखपृष्ठ हे पुस्तक वाचल्यानंतर त्याला अगदी साजेसं आहे असं मी म्हणीन. त्याच बरोबर पुस्तकाची बांधणीही सुंदर आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दुःख असते. वरवर माणूस कितीही सुखी असला तरी त्याच्या आयुष्यात दुःखाचा एक कोपरा असतोच. आणि "रांजण" या कथासंग्रहात आपले मनोगत व्यक्त करताना सुखाबरोबरच लेखिकेने, दुःख म्हणजे काय तर "रांजण" सारख्या एखाद्या खोल भांड्याच्या तळाशी, अंधारात दडलेली भावना असावी. आणि ती हात घातला तरच जाणवेल. असं म्हटलं आहे. त्या जाणिवेला आपल्याला जाणीवपूर्वक टाळता आलं तर आपण त्या मानाने सुखी राहूच शकतो.
अंधारास द्यावा नेहमी प्रकाश
अंधाराशी अंधाराने लढू नये
एक दिवा नेहमी असावा सोबत
वाऱ्याशी उगा त्याला भिडवू नये
अंधाराशी अंधाराने लढू नये
एक दिवा नेहमी असावा सोबत
वाऱ्याशी उगा त्याला भिडवू नये
या कथासंग्रहात ४८ कथा आहेत. लेखिकेने विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे. प्रत्येक कथा मनाला भिडते.
पहिल्याच कथेत दुष्काळाने गर्दीभरल्या विहिरीचं खोल तळाशी गेलेलं पाणी, विहिरीतून पोहरा भरताना ज्यानीचा फुटलेला पान्हा, तिथे घरी चुलीतील निखाऱ्याकडे आकर्षित झालेले नऊ महिन्याचे बाळ. आणि हे सताड उघड्या डोळ्यांनी पाहत असलेला तो नभीचा सूर्य. या साखळीत गुंफलेली ही कथा. कसं आहे ना..!! बाईच्या वाट्याला विहारीच्या तळाशी जाणं येतच...
कवडसे या कथेतून एका स्त्रीवर अत्याचार होत असताना, माणूसपण मिरवणाऱ्या गर्दीने तमाशा बघावा याहून दुसरे पातक आणि छंडपणा तो काय..!! पण जेव्हा जात जाता जात नाही, तेव्हा माणसात माणुसकी राहत नाही. आजही माणूस म्हणवून घेणारा समाज नक्की माणूस म्हणून कधी वागतो हा प्रश्न अनुत्तरितच आहे. याउलट अखेरीस समाजात आजही संत प्रवृत्तीची माणसं सुद्धा आहेत ही सुद्धा बाजू लेखिकेने मांडली आहे.
आपल्या नवऱ्याला आपल्याच घरात विवस्त्र, परस्त्रीच्या बाहुत पाहताना, 'रांजणातील' अंधाराला प्रश्न विचारणाऱ्या संगीची घालमेल लेखिकेने "रांजण" या कथेत व्यथित केली आहे.
या कथासंग्रहात पाच पत्र आहेत. त्यात पहिल्या पत्रात लेखिकेने कचराकुंडीतील कचरा उचलणाऱ्या शिर्जाने सरकार मायबापला लिहिलेलं हे पत्र. तसं पाहायला गेलं तर या विषयाला कोण हात घालतो..! पण शिर्जा ची कैफियत मांडताना लेखिकेने त्या कचऱ्यातील वस्तूचे दाखले अगदी अचूक टिपले आहेत. हे पत्र वाचून त्यांच्याप्रती आपला दृष्टिकोन नक्कीच बदलेल....
दुसरं बाबांस लिहिलेलं पत्र वाचतांना अक्षरं धूसर होतात... आणि शब्द निःशब्द होऊन कंठात अडकून बसतात.
तिसरं आरशाला लिहिलेल हे पत्र. सारं काही स्पष्ट दिसत असताना खूप काही लपवत असतो आरसा. हेच लेखिकेला सांगावस वाटत असाव या पत्रातून.
चौथे पत्र... प्रोडक्शन मॅनेजरने आपल्या साहेबाला लिहलेल्या पत्रात शेवटी तो म्हणतो, साहेब एकच सांगतो... आयुष्याला कुटुंब नावाचं टार्गेट आलं नं तर कुठलंही टार्गेट आचिव्ह करणे कठीण नाही. जमलं तर पुढच्या दिवाळीला तुम्ही हे टार्गेट ठेऊन बघाल का ?? किती सूचक विनंती लेखिकेने केली आहे.
पाचवं शेतकऱ्याने शेतमातीला लिहिलेल हे पत्र. या पत्रात एकंदरीतच परिस्थिती पाहता, स्मार्टशिटी पेक्षा स्मार्टशेती करायला जमेल का..!! हे सरकारला विचारण्यासाठी, शेतमातीनेच एक पत्र आता लिहावं असं लेखिकेला अभिप्रेत आहे. हे किती सूचक..!!
परीसाचा स्पर्श तर अंगावर काटा उभा करतो. मुळात ही कथा नाही तर एक कादंबरीच आहे. नात्यांना जेव्हा नाव नसते, तेव्हा जग सोयीने त्याला नाव देऊन बदनाम करते. मग ते कुठलंही नातं असो. अन या कथेत तर नोकर आणि मालकाच्या मतिमंद मुलीच्या नात्याची वीण गुंफलेली आहे.
मेतकूट वाचताना प्रेम या शब्दात किती गहिरेपन असते (आंधळेपणा?) याची जाणीव होते. तसे आजचे वास्तव काही वेगळे नाही. पण त्या प्रेमात आईवडिलांचेही प्रेम सामील असायला हवेच असे वाटते... आजच्या पिढीला ते मान्य नाही की आईवडिलांना..!! हा प्रश्न गुलदस्त्यात आहे...असो.
रेडिओस्वीटी, एका पायाने कमकुवत असलेली, त्याच्या प्रत्येक प्रश्नाच अचूक उत्तर देणारी अबोली आणि 97.8 रेडियो स्वीटी वरून बोलणारा, अगणित चाहत्यांच्या आवाज गर्दीतून अबोलीचा आवाज लक्षात ठेवणारा निनाद... यांच्या प्रेमाची कथा अगदी अप्रतिम जमलेली आहे.
बाकी शून्य..!! आपण शून्य असलो तरी आपल्याला सहस्त्र, लक्ष, कोट, अब्जाधीशाच्या पंगतीत बसता येतं. फक्त आपण आधी की नंतर हे समजलं पाहिजे. हे या कथेतून स्पष्ट होतं.
दारूने लाख संसार उध्वस्त होतात मात्र जास्त सोसावं लागतं ते स्त्रियांनाच हे वास्तवही लाल चिखल या कथेतून लेखिकेने अगदी मांडलं आहे.....
गोकुळ... गावातला निसर्ग गोकुळ या कथेत वाचताना, आपण ही त्या निसर्गाच्या सानिध्यात असल्याचे वाटते...
अशीच रहावी मांदियाळी
असेच रहावे गोकुळ इथले
असाच रहावा स्नेहाचा जागर
गोकुळात वसती माणुसकीचे इमले
अशीच रहावी मांदियाळी
असेच रहावे गोकुळ इथले
असाच रहावा स्नेहाचा जागर
गोकुळात वसती माणुसकीचे इमले
गुलाल मध्ये रंगवलेली मुलगी जेव्हा तिला स्पर्श करणाऱ्या मुलाच्या कानफडीत वाजवते आणि म्हणते, तुम्ही मला स्पर्श करण्याआधी जर मैत्री केली असती, तर हा गुलाल आज मैत्रीचा रंग झाला असता. एखादी मुलगी आवडत असेल तर नक्की मैत्री करा पण तिच्यावर हात उचलणारी परिस्तिथी आणू नका. आणि हे तिचा बाबा लपून ऐकत असतो. आणखीन काय हवं असतं बापाला, नाही...!
काय आणि किती कथांचे दाखले द्यावे. प्रत्येक कथेचा एक नवा विषय, नवा आशय लेखिकेने आपल्यासमोर लेखबद्ध केला आहे. सर्वच कथा अगदी छान जमल्यात. समाजातील बऱ्याच बाबींवर त्यांनी अगदी सहज आपल्या कथेतून बोट ठेवले आहे. 'रांजणातल्या' खोल तळाशी असलेल्या अंधाराला प्रकाशात आणण्याचे दिव्य त्यांनी त्यांच्या कथेतून केले आहे. आणि हेच मला या पुस्तकात खूप भावले आहे.
त्यांच्या पुस्तकातील शेवटच्या कथेची शेवटची ओळ आहे, भेटू या मग...!! तर हो नक्कीच भेटू या... तूमच्या अशाच आशयपूर्ण कथा आम्हाला तुमच्या नवीन कथासंग्रहात लवकरच वाचायला मिळतील याची आम्ही वाट पाहत आहोत. शुभेच्छा आणि धन्यवाद...
पुस्तकाचे नाव #रांजण
लेखिका :- © नम्रता माळी पाटील
प्रकाशक :- नंदिनी संतोष तांबोळी, नंदिनी पब्लिशिंग
हाऊस
मुखपुष्ठ :- जितू काळे
लेखिका :- © नम्रता माळी पाटील
प्रकाशक :- नंदिनी संतोष तांबोळी, नंदिनी पब्लिशिंग
हाऊस
मुखपुष्ठ :- जितू काळे
©____नित 9637138031

Comments
Post a Comment